नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकरणावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले शरद पवार? अनिल देशमुख महाराष्ट्राचे आणि विशेषत: विदर्भाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर दगडफेक करणं किंवा हल्ला करणं, असा प्रकार होईल, अशी चर्चा आम्ही यापूर्वी तिथं ऐकली होती. आम्ही या घटनेचा निषेध करतो असे शरद पवार म्हणाले आहेत. काय घडले नेमके? नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत होते. अचानक काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही लोकांनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला का आणि कोणत्या कारणामुळे करण्यात आला? हे अद्याप समोर आलेले नाही.