मुंबई : शिवसेना (उबाठा) नेते व माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून व माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी सवांद साधला. यावेळी भावूक होत त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले. ते म्हणाले, अभिषेक असता तर हा प्रश्न आला नसता. अभिषेक आणि सून यात फरक आहे ना. मुलाचे कान आपण कधीही धरू शकतो, पण सूनबाईचे धरता येत नाहीत, असं म्हणत घोसाळकर यांनी आपली व्यथा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. घरात राजकारण आणले नाही. पण आता तेजस्वी भाजपमध्ये गेली आहे, तर मी शिवसेनेत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तेजस्वी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर घोसाळकर यांनी सांगितले की, तेजस्वीने हा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली होती. काल संध्याकाळी आम्ही सर्वजण बसलो होतो. तिने मला सांगितले की, डॅडी मी असा निर्णय घेत आहे. मी कुटुंबप्रमुख म्हणून जे सांगायचे ते सांगितले. पण दबाव आणता येत नाही. ती स्वतंत्र आहे, निर्णय घेण्याचा अधिकार तिचा आहे,असं घोसाळकर म्हणाले. त्यांनी पक्षप्रमुखांना याबाबत तात्काळ माहिती दिल्याचेही सांगितले. तिने जे केले त्यावर मी बोलू शकत नाही. पण मी पक्षप्रमुखांना सांगितले की, तेजस्वीने असा निर्णय घेतला आहे. पुढे म्हणाले, अभिषेकने दोनदा जिंकले होते. नंतर आम्ही मागणी केली की त्याच्या जागी तेजस्वीला घ्या. पण एक वर्ष लागले. कारण काय ते माहीत नाही. असं ते म्हणाले. राजकारण आणि कुटुंब याबाबत बोलताना ते म्हणाले, शिवसेना सत्तेसाठी नाही. बाळासाहेबांनी सांगितले होते की, मी सत्तेवर लाथ मारतो. आता मीही त्या रांगेत आहे. एका घरात दोन पक्ष असतील तर मानावे लागेल. मागील १० वर्षांत राजकारणात असे होऊ लागले आहे. घोसाळकर यांनी शेवटी पुन्हा सांगितले, “आम्ही घरात राजकारण करत नाही. नातवंडं आहेत, मी त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही. सूनबाईचे कान धरता येत नाहीत.” तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना (उबाठा)ला मोठा धक्का मानला जात आहे. त्या दहिसर भागातील माजी नगरसेविका होत्या आणि स्वर्गीय अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत.