तेजस्वी यादव यांनी सरकारी बंगला सोडल्यानंतर बंगल्यातून सामान गायब

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी रिकाम्या केलेल्या सरकारी बंगल्यातून सोफा, पाण्याचे नळ, वॉश बेसिन, एअर कंडिशनर, दिवे, बेड गायब आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीने केला आहे आणि या वस्तू चोरीला गेल्याचे सुचित केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रीय जनता दल या तेजस्वी यादव यांच्या पक्षाने भाजपला यादी जाहीर करण्यास सांगितले आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी पाटणा येथील 5 देशरतन रोड येथील तेजस्वी यादव यांच्या बंगल्यात जाण्याच्या काही दिवस आधी हा प्रकार समोर आला आहे. चौधरी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नवीन घरात म्हणजे अगोदर तेजस्वी ज्या बंगल्यात राहत होते त्या बंगल्यात प्रवेश करणार आहेत.उपमुख्यमंत्र्यांच्या घरातील सामान कसे लुटले गेले, हे आम्ही समोर आणत आहोत. सुशील मोदी जेव्हा या घरात स्थलांतरित झाले तेव्हा तेथे दोन हायड्रॉलिक बेड होते, पाहुण्यांसाठी सोफा सेट होते, त्या सर्व गोष्टी गहाळ आहेत, असे सम्राट चौधरींचे पर्सनल सेक्रेटरी शत्रुघ्न प्रसाद यांनी माध्यमांना सांगितले.
20 पेक्षा जास्त स्प्लिट एसी गायब आहेत. ऑपरेटिंग रूममध्ये संगणक किंवा खुर्ची नाही. स्वयंपाकघरात फ्रीज किंवा आरओ नाही. भिंतीवरून दिवे काढून नेण्यात आले आहेत असेही त्यांनी पुढे सांगितले. बिहारमधील बेगुसरायचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी आरजेडी नेतृत्वावर टीका केली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील चोरीचा प्रकार सिध्द करण्यासाठी तपशीलवार तपासणी करण्याची मागणी केली आहे.





