पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आझम पानसरे अनेक वर्षानंतर महापालिकेच्या कारभारात पुन्हा सक्रिय झाल्याचे आज (मंगळवारी) स्पष्ट झाले. शहरातील पाणीटंचाई, वायसीएममधील पीजी इन्सिट्यूट, कचरा समस्येवर आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. पानसरे सक्रिय झाल्यामुळे भाजपापुढील अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणामध्ये मोठा दबदबा असणारे आणि ज्येष्ठ राजकीय नेते अशी ओळख असणारे पानसरे राष्ट्रवादी सोडून भाजपात गेल्यानंतर काही वर्षांपासून राजकीय विजनवासात होते. भारतीय जनता पक्षात त्यांना प्रवेश देताना पक्षाकडून त्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र गेल्या पाच वर्षांत भाजपकडून त्यांचा अपेक्षाभंग झाला.
लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी आपला मुलगा निहाल पानसरे यांना राष्ट्रवादीत पाठविले होते. पुत्र राष्ट्रवादीत असतानाही पानसरे मात्र भाजपातच होते. विधानसभा निवडणुकीत पानसरे यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत व पुरस्कृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादी प्रवेश करतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यांनी भाजप सोडण्याची किंवा राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेशाची घोषणा केली नाही.
परंतु शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शहरात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आझम पानसरे यांनी हजेरी लावली. त्यामुळे पानसरे हे राष्ट्रवादीत सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी पानसरे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन पाणीटंचाईवर चर्चा केली. आंध्रा, भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा विषय, वायसीएम रुग्णालयातील पीजी इन्सिट्यूटसाठी सुरू असलेली पदभरती, कचरा ठेका यासह विविध विषयांवर चर्चा केली. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत पालिका अधिकारी व आयुक्तांची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष वाघेरे यांनी दिली.
सत्ताधाऱ्यांपुढील अडचणी वाढणार
आझम पानसरे हे गेली 30 ते 35 वर्षे शहरातील राजकारणात सक्रिय आहेत. महापालिकेतही त्यांनी विविध पदांवर अनेक वर्षे काम केले आहे. पालिकेतील कामाचा अनुभव, अधिकाऱ्यांशी असलेले नाते त्यातच विकासकामे करून घेण्याचा अनुभव यामुळे भाजपाच्या वाटेतील अडथळे वाढणार असून अधिकाऱ्यांची मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोची होण्याची शक्यता आहे.