काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. हे प्रकरण उघडकीस येताच संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला होता. या प्रकरणाचा तपास सरकारकडून सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी SIT देखील स्थापन करण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी सीआयडीकडून या प्रकरणात आरोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली. आरोपींनी अत्यंत क्रूर पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. हे फोटो व्हायरल होताच राज्यात वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. संभाजी भिडेंनी दिला सल्ला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर आल्या. यावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे आणि सगळ्याच राजकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन चरित्र वाचावं असा सल्ला यावेळी संभाजी भिडे यांनी दिला. वाल्मिक कराड मास्टरमाईंड संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणात सीआयडीनं आरोप पत्र दाखल केलं आहे. वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मास्टरमांईड असल्याचं सीआयडीनं आपल्या आरोप पत्रात म्हटलं आहे. संतोष देशमुख यांनी खंडनीला विरोध केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असं सीआयडीच्या आरोप पत्रात म्हटलं आहे.