“मी त्यांना शिव्या…” सुनील शेट्टीला अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन

मुंबई – अभिनेता सुनील शेट्टीने अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही तो सोशल मीडियावर चर्चेत असतो. वयाची साठी ओलांडल्यानंतरही सुनील शेट्टी आपल्या फिटनेसमुळे अनेकांना चकित केले आहे. नुकतेच एका मुलाखतीतमध्ये त्याने नव्वदच्या दशकात त्याला अंडरवर्ल्डमधून फोन येत असे, हा मोठा खुलासा केला आहे. मात्र तेवाह त्याने योग्य अशा त्यांच्याच भाषेत उत्तरे देऊन अंडरवर्ल्डच्या विरोधात भूमिका घेतली होती.
याबाबत सुनील शेट्टी म्हणाला की, “नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डचा दबदबा वाढला होता. मला त्यांच्याकडून बऱ्याचदा धमकीचे फोन येत असे. पण मी त्यांना शिव्या देत असे. माझं हे वर्तन पाहून पोलीस माझ्यावरच चिडायचे. ते मला सांगायचे तू काय करतोस. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अंडरवर्ल्डच्या लोकांना राग आल्यानंतर ते टोकचे पाऊल उचलू शकतात. माझ्या या वागण्याने पोलिसही हैराण होत, पण यात माझी काहीच चूक नाही. उलट मी पोलिसांना तुम्ही त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे असे सांगत असे.”
सुनीलच्या वडिलांनी चूक नसेल तर घाबरण्याची काही गरज नाही ही शिकवण दिल्यामुळे त्याच्यात ही हिंमत आल्याचे त्याने सांगितले. इतकेच काय तर अंडरवर्ल्डच्या या धमक्यांबद्दल त्याने आतापर्यंत कधीच अथिया किंवा अहानला सांगितले नाही. यावेळी त्याने लहानपणीच्या काही आठवणींना देखील उजाळा दिला. लहानपणी तो नेपेन्सी रोडला राहात होता. तेथील एक अनुभव त्याने सांगितला आहे.
“नेपेन्सी रोड या परिसरात गँग्स आणि इतर अनेक गोष्टीघडत असत. तिथूनच लॅमिंग्टन रोडवर मुंबईतील पहिली गोल्डन गँग निर्माण झाली होती. पण तो कुख्यात परिसर होता असे मी म्हणणार नाही. व्यवसायासाठी ती खूप चांगली जागा होती, पण आम्ही तिथे लहानाचे मोठे व्हावे, अशी वडिलांची इच्छा नव्हती”, असेही सुनील शेट्टीने सांगितले.
दरम्यान, सुनील शेट्टी हे नुकतेच ‘हंटर तुटेगा नहीं तोडेगा’ आणि ‘धारावी बँक’ या वेब शोजमध्ये झळकले होते. हंटर’ ही एक अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज होती, जी एसीपी विक्रम सिन्हाच्या भूमिकेतील सुनील शेट्टीला मुंबईच्या गुन्हेगारी जगताच्या अंधाऱ्या रस्त्यावर घेऊन जाते.





