पंकजा मुंडे, रोहित पवार यांच्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांचे झळकले बॅनर

ठाणे : राज्यात मराठा आरक्षण, महिलांवरील अत्याचार या घटना चर्चेत असताना ठाण्यामध्ये आज बॅनरबाजी पाहायला मिळाली. या बॅनरबाजीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही बॅनरबाजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतोद आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी करण्यात आली. आतापर्यंत भावी मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे, रोहित पवार, नाना पटोले, अजित पवार यांचे बॅनर झळकले होते. आता भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतोद आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ठाण्यात बॅनर झळकले आहेत.
बॅनरवरील मजूकर चर्चेत
ठाण्यातील वर्दळीच्या मुलूंड चेकनाका परिसरात जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त काही प्रमुख का’‘र्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावले आहेत. यामधील एका बॅनरवर ‘भावी मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असा आशय आहे. आता खरंतर आव्हाडांचा वाढदिवस 5 ऑगस्टला आहे, त्याआधी ही बॅनरबाजी कऱण्यात आली, आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
ठाण्यातील बहुतांश भागात आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त जरी बॅनर लागले असले, तरी हे बॅनर मात्र लक्षवेधी ठरलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील पदाधिकारी सुहास दळवी आणि चेतन दळवी यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.





