प्रसुतीनंतर 250 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करत दिली परिक्षा; पहिली आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश होण्याचा मिळवला मान

V Sripathy Success Story: तामिळनाडूच्या आदिवासी समुदायातील महिला व्ही. श्रीपथी यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्रीपथी यांनी प्रसुतीनंतर दोनच दिवसांत 250 किलोमीटर प्रवास करुन परीक्षा दिली आणि मोठे यश मिळवत देशातली पहिली आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश होण्याचा मान मिळवला.
अनेकदा स्त्रींना लग्नानंतर आणि बाळ झाल्यानंतर आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करावे लागते. मात्र याही परिस्थतीत जिद्दीने एक महिला मोठे यश मिळवू शकते. हेच श्रीपथी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. चला तर मग श्रीपथी यांचा संघर्षमय प्रवास आपण जाणून घेऊयात…
कोण आहे श्रीपथी ? V Sripathy Success Story |
श्रीपथी या अवघ्या 23 वर्षांच्या असून त्या तमिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पुलियूर गावातील मल्याळी जमातीतील येलागिरी हिल्सच्या रहिवासी आहेत. तिरुवन्नमलाई येथील राखीव जंगलाच्या सीमेवर असलेल्या थुविंजीकुप्पम येथे त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेहनतीच्या बळावर तिने हे यश मिळवत त्यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे. श्रीपतीने बीए आणि एलएलबी पर्यंतचं शिक्षण येलागिरी हिल्स येथे पूर्ण केले.
श्रीपथी यांचे लहान वयातच लग्न झाले होते. त्यानंतर त्यांनी पती आणि आईच्या पाठिंब्याने एलएल.बी. पूर्ण केले आणि तामिळनाडू लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज केला. श्रीपथी यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये चेन्नई येथे 250 किमीपर्यंतचा प्रवास करत त्यांनी TNPSC ची परीक्षा दिली होती आणि काही दिवसांपूर्वी अंतिम निवडीसाठी मुलाखत दिली होती. या पदासाठी त्यांची निवड झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांच्याकडून कौतुक V Sripathy Success Story |
श्रीपथी यांना मिळालेल्या मोठ्या यशानंतर मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. “आदिवासी म्हणून अत्यंत दुर्गम भागात राहाणाऱ्या, कोणत्याही पायाभूत सुविधा नसलेल्या वर्गातील एका तरुणीला हे यश मिळालेलं बघून मला आनंद आणि अभिमान वाटतो. द्रमुकच्या द्रविड मॅाडेल सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये तमिळ माध्यमात शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे श्रीपतीची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली.
श्रीपथी हिची आई आणि पती यांनी तिला दिलेल्या भक्कम पाठिंब्यासाठी मी त्यांचंही अभिनंदन करतो,” असेही स्टॅलिन यांनी म्हटलेआहे. तमिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनीही श्रीपतीचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल श्रीपथी यांचे त्यांच्या गावात ढोल-ताशे, हार आणि भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.





