सलग चार पराभवनांतर कोलकाता विजयी ! RCB च्या पदरी मात्र निराशा

बंगळुरू -विराट कोहलीने फटकावलेल्या जिद्दी अर्धशतकी खेळीनंतरही प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्याने रॉयल चॅलेंजर बंगळुरूला आयपीएल स्पर्धेत बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
कोलकाताने विजयासाठी दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना भरात असलेला फाफ डुप्लेसी अपयशी ठरला. त्यानंतर बंगळुरूचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. यावेळी कर्णधार विराट कोहलीने मात्र जिद्दी खेळी केली. त्याने यंदाच्या स्पर्धेतील पाचवे अर्धशतक फटकावले. आलेल्या शाहबाज अहमद व ग्लेन मॅक्सवेलने साफ निराशा केली. कोहलीने महिपाल लोमरोरच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले. मात्र, त्यानंतर कोहलीचाही संयम सुटला व तो 54 धावांवर परतला. त्याने या खेळीत 37 चेंडूत 6 चौकार फटकावले. लोमरोरने 18 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर आलेला सुयश प्रभुदेसाई देखील चमक दाखवू शकला नाही. त्यावेळी दिनेश कार्तिकने वनिंदू हसरंगाच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने संघाचे दीडशतक फलकावर लावले.
हसरंगानेही वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात आपली विकेट फेकली. यावेळी त्यांना विजयासाठी 3 षटकांत 48 धावांची गरज होती. कार्तिकला साथ देण्यासाठी डेव्हीड विली खेळपट्टीवर होता. कार्तिकसमोर आक्रमक खेळण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता व तो याच प्रयत्नात 22 धावांवर बाद झाला. त्याने 18 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावला. कार्तिक परतल्यावर त्यांना 12 चेंडूत 44 धावांची गरज होती. विजयकुमार वैशक नाबाद 13 व विली नाबाद 11 यांनी चमक दाखवली मात्र, मोठ्या आव्हानासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले व बंगळुरुला 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 गडी बाद केले. आंद्रे रसेल व सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, जेसन रॉयचे अर्धशतक तसेच कर्णधार नितीश राणा व रिंकू सिंग यांनी केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने बुधवारी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बंगळुरूसमोर विजयासाठी 201 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजी दिली. कोहलीचा निर्णय सार्थ ठरवताना सलामीवीर जेसन रॉय व एन. जगदीशन यांनी 83 धावांची सलामी दिली. जगदीशन त्यामानाने संथ फलंदाजी करत होता. मात्र, अचानक गिअर बदलून आक्रमक फलंदाजीच्या प्रयत्नात तो 29 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 27 धावा करून परतला.
त्याला विजयकुमार वैशकने बाद केले. रॉयने आपले अर्धशतक दिमाखात पूर्ण केले. मात्र, तोदेखील त्यानंतर स्थिरावू शकला नाही. त्याने 29 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. यावेळी त्यांची स्थिती 10 व्या षटकात 2 बाद 88 अशी होती व खेळपट्टीवर कर्णधार नितीश राणा व व्यंकटेश अय्यर होते. या जोडीने बंगळुरूच्या संमिश्र गोलंदाजीचा टिच्चून सामना केला व वेगाने परंतु सावध खेळताना संघाचे शतक फलकावर लावले. या जोडीने आक्रमक व जलद धावा करताना संघाला दीडशतकी मजलही मारून दिली. अवघ्या 21 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारांची बरसात करत राणा 48 धावांवर बाद झाला व त्याचे अर्धशतक हुकले. पाठोपाठ स्थिरावलेला व्यंकटेश अय्यरही 26 चेंडूत 3 चौकारांसह 31 धावा करून परतला.
यावेळी रिंकू सिंगला साथ देण्यासाठी आलेल्या आंद्रे रसेलने पुन्हा एकदा निराशा केली. रिंकूने मात्र नेहमीच्याच ढंगात फलंदाजी केली व डेव्हीड विसेच्या साथीत डावाला बळकटी प्राप्त करून दिली. विसेने अखेरच्या चेंडूवर षटकार फटकावताना कोलकाताला 20 षटकांत 5 बाद 200 अशी मोठी धावसंख्या उभारून दिली. रिंकू 10 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह 18 तर, विसे 3 चेंडूत 2 षटकारांसह 12 धावांवर नाबाद राहिले. बंगळुरूकडून वनिंदू हसरंगा व विजयकुमार वैशक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. महंमद सिराजने एक बळी घेतला.
लक्षवेधी
जेसन रॉयचे अर्धशतक
स्थिरावल्यानंतरही जगदिशन व अय्यरकडून निराशा
राणाचे अर्धशतक हुकले
रसेलकडून पुन्हा निराशा
डुप्लेसी साफ अपयशी
कोहलीही अर्धशतकानंतर स्वस्तात परतला
मॅक्सवेलकडूनही निराशा
बंगळुरूची भक्कम फलंदाजी फिरकीसमोर कोसळली
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 5 बाद 200 धावा. (जेसन रॉय 56, नितीश राणा 48, व्यंकटेश अय्यर 31, एन. जगदिशन 27, रिंकू सिंग नाबाद 18, डेव्हीड विसे नाबाद 12, वनिंदू हसरंगा 2-24, विजयकुमार वैशक 2-41, महंमद सिराज 1-33). रॉयल चॅलेंजर बंगळुरू – 20 षटकांत 8 बाद 179 धावा. (विराट कोहली 54, महिपाल लोमरोर 34, वरुण चक्रवर्ती 3-27, आंद्रे रसेल 2-29, सुयश शर्मा 2-30)





