गैरवर्तन केलं म्हणून बारमधून बाहेर काढलं अन् ‘त्याने’ थेट बिल्डिंगच पेटवली; ११ जणांचा बळी

सॅन लुईस रियो कोलोराडो : मेक्सिकोमध्ये एका बारला लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली. मेक्सिकोच्या उत्तर भागात असणाऱ्या सॅन लुईस रियो कोलोराडो या शहरात ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
एका व्यक्तीने गैरवर्तन केल्याबद्दल त्याला बारमधून बाहेर हाकलण्यात आले होते. याचा राग मनात ठेऊन त्याने थेट बारच्या इमारतीलाच आग लावली. यामुळे ही दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे. सोनोरा स्टेटच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. या घटनेवेळी आरोपी भरपूर नशेत होता. तसेच, त्याला बारमधील महिलांशी गैरवर्तन केल्याबद्दल बाहेर काढण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बारला आग लावण्यासाठी या व्यक्तीने मोलोटोव्ह कॉकटेलचा वापर केल्याचंही सांगण्यात येत आहे.
या व्यक्तीने बारच्या दरवाज्यावर हे केमिकल फेकले, आणि त्याला आग लावली. यानंतर ही आग वेगाने पसरून संपूर्ण बार खाक झाला. मृतांमध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. यासोबतच, आणखी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या दुर्घटनेत बळी गेलेली एक महिला अमेरिकेची नागरिक होती. तर, एका १७ वर्षांच्या मुलीचाही यात बळी गेल्याचं समोर आलं आहे. स्टेट अटॉर्नी जनरल गुस्ताव्हो रोम्युलो सालस यांनी याबाबत माहिती दिली. तसंच, या आरोपीला अटक करण्यात आल्याचं शहराच्या महापौरांनी स्पष्ट केलं.





