अतुल सुभाष घटनेची पुनरावृत्ती, सासरच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

Delhi Suicide News: बंगळुरू येथील कंपनीत काम करणाऱ्या अतुल सुभाष यांनी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेसारखेच एक प्रकरण दिल्लीतून समोर आले आहे. दिल्ल्तील कल्याण विहार भागातील पुनीत खुराणा नावाच्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
पुनीतचे वर्ष 2016 मध्ये लग्न झाले होते. पुनीतला पत्नीकडून त्रास दिला जात होता, असा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे. पुनीतने आत्महत्येपूर्वी 59 मिनिटांचा व्हीडिओ देखील रेकॉर्ड केला होता.
पुनीतच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे फोनवर शेवटचे बोलणे पत्नीशी झाले होते. पोलिसांनुसार, दोघांमधील फोनवरील संवाद व्यवसायासंदर्भात होता. दोघांचा बेकरीचा व्यवसाय होता व ते त्यात भागीदार होते. कुटुंबानुसार पुनीत यांची पत्नी फोनवर म्हणाली की, घटस्फोटाचे प्रकरण सुरू असले तरीही तिला व्यवसायातून वेगळे करता येणार नाही.
कुटुंबानुसार, पुनीतच्या बायकोने दोघांच्या संवादाचे रेकॉर्डिंग नातेवाईकाला पाठवले होते. पैशांसाठी त्याला त्रास दिल्याचा आरोपीही करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीच्या बहिणीने आरोप केला की, वडिलांच्या नावावरील घर त्यांनी विकले व पैसे देखील दिले नाहीत. तसेच, भावाने आत्महत्या करण्यापूर्वी 59 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असल्याचेही बहिणीने सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी पुनीतचा फोन ताब्यात घेतला असून, आरोपींची चौकशी केली जात आहे.

