अमरावती : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत भूकंपसदृश धक्के जाणवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील शिवणगाव परिसरात पुन्हा एकदा सकाळी सुमारे १२.०७ वाजता भूकंपासदृश धक्के जाणवले. यापूर्वी २४ आणि २५ नोव्हेंबरला याच परिसरात असे धक्के जाणवले होते. गेल्या तीन महिन्यात या भागात चौथ्यांदा अशी घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. फत्तेपूर येथे घरातील भांडी पडली, तर शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. नागरिक घाबरून रस्त्यावर आले होते. शिवणगावचे सरपंच धर्मराज खडसे यांनी सांगितले, आजचे धक्के मागील महिन्यातील २४ तारखेसारखेच होते. दोन-तीन वेळा कंपने जाणवली. गावकऱ्यांनी घराबाहेर पळ काढली. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनीही भीती व्यक्त करत तातडीने भूकंपमापक यंत्र बसवण्याची मागणी केली. महिन्याभरापूर्वी भूगर्भशास्त्रज्ञांची टीम येथे आली होती, मात्र ठोस निष्कर्ष काही समोर आला नाही. प्रशासनाने शिवणगाव आणि शिरजगाव मोझरी येथे भूकंपमापक यंत्र बसवण्याचे आश्वासन दिले होते, पण ते अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नायक तालुक्यात भूकंपासदृश धक्के जाणवले. तालुक्यातील सुमारे १० गावांमध्ये, विशेषतः पिंपळदरी परिसरात नागरिक घाबरून रस्त्यावर धावले. यापूर्वी ३ डिसेंबरला वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रात्री १०:४९ वाजता भूगर्भातून मोठा आवाज येऊन जमीन हादरली होती. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात अशा सौम्य धक्क्यांच्या घटना वाढल्याने भूगर्भशास्त्रज्ञांचे लक्ष वेधले आहे. मात्र, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून या घटनांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. नागरिकांनी अशा वेळी घराबाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. या प्रकरणी प्रशासनाकडून तातडीने तपासणी आणि उपाययोजना अपेक्षित आहेत.