भारतातील प्रत्येक घरात पोहोचणार स्वस्त इंटरनेट, Airtel पाठोपाठ जिओने केला मस्क यांच्या मालकीच्या ‘या’ कंपनीशी करार

Jio-Bharti Airtel agreements with SpaceX | भारतात स्वस्त इंटरनेट उपलब्ध करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. नुकतेच एअरटेलने भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवा उपलब्ध करण्यासाठी मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्स कंपनीसोबत करार केला आहे. एअरटेल पाठोपाठ आता देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने देखील स्पेसएक्ससोबत असाच करार केला आहे.
दोन्ही कंपन्यांनी स्टारलिंक सेवेसाठी स्पेसएक्ससोबत करार केला असला तरीही ही सेवा भारतात उपलब्ध होणार की नाही, हे सरकारच्या परवानगीवर ठरणार आहे. या भागीदारी अंतर्गत जिओ आणि स्पेसएक्स भारतीय बाजारपेठेत स्टारलिंकला अधिक चांगल्या प्रकारे ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतील.
जिओच्या ग्राहकांना स्टारलिंकची सुविधा जिओ स्टोअर्समध्ये तसेच ऑनलाइन उपलब्ध होईल. स्टारलिंक जिओला जिओएअरफायबर आणि जिओफायबरचा विस्तार दुर्गम भागात जलद आणि परवडणारी हाय-स्पीड इंटरनेट सुविधा प्रदान करण्यास मदत करेल.
Stars are aligned! ⭐🚀
Jio + @SpaceX = @Starlink for #DigitalIndia#WithLoveFromJio pic.twitter.com/oPDdaCcm5o
— Reliance Jio (@reliancejio) March 12, 2025
स्टारलिंक सेटेलाइटच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवते. जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांमध्ये कंपनीची हाय-स्पीड व स्वस्त इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. आता जिओ आणि एअरटेलसोबतच्या करारामुळे लवकरच भारतात देखील कंपनीची सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
स्पेसएक्ससोबतच्या कराराबाबत बोलताना रिलायन्स जिओचे ग्रुप सीईओ मॅथ्यू ओमन म्हणाले की, प्रत्येक भारतीयांपर्यंत स्वस्त आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवा पोहोचवणे ही जिओची प्राथमिकता आहे. स्टारलिंक भारतात आणण्यासाठी स्पेसएक्ससोबतचे आमचे सहकार्य याच वचनबद्धतेला बळकटी देते. सर्वांसाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.’
स्टारलिंक काय आहे?
स्टारलिंक ही एक सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवा टेक्नोलॉजी आहे. याच्या मदतीने कोणत्याही तार किंवा टॉवरशिवाय लोकांपर्यंत सहज इंटरनेट पोहोचवले जाते. यामध्ये इंटरनेट प्रदान करण्यासाठी सॅटेलाइट-आधारित रेडिओ सिग्नलचा वापर केला जातो. भारतात या इंटरनेट सेवेसाठी किती शुल्क आकारले जाईल, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.





