कराड -करोनाच्या सापडलेल्या सर्वाधिक रुग्णसंख्येने संपूर्ण राज्यात “हॉटस्पॉट’ बनलेल्या कराड तालुक्यातील वनवासमाची गाव 14 दिवसांपूर्वी करोनामुक्त झाले. त्यानंतर गावची स्थिती आरोग्याच्या दृष्टीने नियंत्रणात आल्याने त्या प्रशासनाने कंटेन्टमेंट झोनमुळे गावासाठी असणारे जाचक नियम व अटी हळूहळू शिथील करुन आता शनिवारी मध्यरात्रीपासून येथील सर्व पोलीस बंदोबस्त हटवून गाव कंटेन्टमेंटमुक्त केले आहे. परिणामी तब्बल दीड महिन्याने वनवासमाचीतील ग्रामस्थांनी मोकळा श्वास घेऊन नव्या जोमाने आपला संसार पुन्हा सावरण्यास सुरुवात केली आहे. करोना आजाराने सर्वत्र चांगलेच थैमान घातले आहे. कराड तालुक्यातील बाबरमाची येथील करोना संशयित रुग्णाच्या संपर्कात आल्याने वनवासमाचीतील (खोडशी) 35 वर्षीय युवक (दि. 21 एप्रिल रोजी) करोनाबाधित असल्याची माहिती समोर आली. त्यावेळी वनवासमाचीसह परिसरात खळबळ उडाली. आरोग्य विभागासह संबंधित पथक गावात पोहोचले. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ वनवासमाची गावच्या मुख्य प्रवेश मार्गासह, गावातील अंतर्गत सर्व रस्ते, दुकाने बंद करुन गाव पूर्णतः सील केले. तसेच ग्रामस्थांनी करोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार व पथक सातत्याने जनजागृती करुन आवश्यक उपाययोजना करीत होते. मात्र, त्यानंतर येथील रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली होती. 15 दिवसांत येथील रुग्णसंख्या 39 वर जाऊन पोहोचली होती. दरम्यान, वनवासमाची येथील वाढती संसर्ग साखळी तोडण्यासाठी गावातील 247 लोकांची स्वॅब तपासणी करण्यात आली. तसेच 198 लोकांना क्वारंटाइन करुन त्यांना कराडच्या वेगवेगळ्या संस्थांच्या विलगीकरण कक्षात ठेवून गावात विविध उपाययोजना करण्यात आल्या. बाधित रुग्णांवर कराडच्या कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल व उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. आरोग्य विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वनवासमाची गाव अखेर करोनामुक्त झाले. दरम्यान, कंटेन्टमेंट झोनमुळे वनवासमाची गावातील व्यवहार पूर्णतः बंद होते. ग्रामस्थांना गेल्या दीड महिन्यांपासून घराबाहेर पडता आले नव्हते. गावातील लॉकडाऊनमुळे लोकांचे जीवनमान पूर्ण विस्कळीत झाले होते. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेकांच्या उद्योग-धंद्यांवर परिणाम झाला. गावातील लोकांची विविध प्रकारची कामे खोळंबली होती. मित्र, नातेवाईकांसह, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गावातील ग्रामस्थांना वेगवेगळ्या पध्दतीने त्यावेळी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनवासमाची करांना आपले खचलेले संसार पुन्हा नव्या जोमाने सावरण्यासाठी व स्वतःच्या हिमतीवर आपला कुटूंबगाडा हाकण्यासाठी आपल्या पायावर उभे राहायचे आहे. त्यासाठी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसह, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे वनवासमाची गाव कंटेन्टमेंटमुक्त करण्यासाठी पाठपुरावा केला होता. प्रांताधिकाऱ्यांनी गावचा सर्व आढावा घेऊन गाव शनिवारी मध्यरात्रीपासून खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गावातील पिठाच्या गिरणीसह, सर्व दुकाने, दैनंदिन व्यवहार व इतर कामे सुरळीतपणे सुरू झाली आहेत. कंटेन्टमेंट मुक्तीनंतर हे गाव लवकरच आता पूर्वपदावर येईल, असा ग्रामस्थांना विश्वास आहे.