Afghan Taliban Attacks Pakistani Posts: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात हवाई हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाला होता. आता अफगाणिस्तानकडून या हवाई हल्ल्याचा बदला घेत पाकच्या सैनिकांवर हल्ला केला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेवर झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या निमलष्करी दलाचे 19 जवान ठार झाले, तर काहीजण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या प्रत्युत्तरात काही अफगान सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांत आणि अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांताच्या सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्याकडून रात्रभर गोळीबार सुरू होता. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमधील दक्षिणपूर्वेतील पक्तिका प्रांतात पाकिस्तानकडून हवाई हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या हल्ल्यात 46 जण मारले गेल्याचा आरोप तालिबानच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती. त्यानंतर आता अफगाणिस्तानकडून पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला आहे. हवाई हल्ल्याबाबत बोलताना पाकच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष करण्यात आले होते, असा दावा केला होता. सीमेवरील चकमकीबाबत तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली की, त्यांच्या सैन्याने पाकिस्तानमधील काही ठिकाणांवर हल्ला केला आहे. या ठिकाणांचा वापर हल्ल्यांचे नियोजन आणि समन्वय करण्यात सहभागी असणाऱ्यांना लपण्यासाठी केला जात होता.