सासवड : सध्या अतिरिक्त प्रमाणात होत असलेला रासायनिक खतांचा अती वापर तसेच कीटकनाशक, तणनाशक यांचा वापर यामुळे जमिनीमधील सूक्ष्मजीवांची संख्या कमी होत असल्याने जमिनी कडक होत आहेत. जमिनीतील सूक्ष्म जीवांची संख्या कमी झाल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होतो. आपल्या भागातील जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.5 पेक्षाही कमी आहे असे माती परीक्षणवरून दिसते. सेंद्रिय कर्ब एक किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास जमीन चांगली राहिल्याने जमिनीत हवा खेळती असल्यास उत्पादनात वाढ होते, असे मत मंडळ कृषी अधिकारी अनिल धुरगुडे यांनी व्यक्त केले. कांबळवाडी (ता. पुरंदर) येथे जागतिक जागतिक मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन नवनाथ धोत्रे यांच्या अंजीर बागेमध्ये केले होते. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, त्यावेळी धुरगुडे बोलत होते. यावेळी कृषी पर्यवेक्षक संदीप कदम, कृषी सेवक हर्षवर्धन इंगळे, धीरज अहिवळे, गौरी सस्ते, धनश्री रोटे, गोपाळ कदम, मुरलीधर यादव, गुलाब थोपटे, आप्पा यादव, मुकुंदराज यादव तसेच सटलवाडी हरगुडे पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षका माधवी नाळे म्हणाल्या की, जमिनीत सूक्ष्मजीवांची वाढ होवून, जमिनी हवा खेळती राहते. उत्पादन चांगले मिळते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी पिकांची फेरपालट आवश्यक आहे तसेच जास्तीत जास्त सेंद्रिय खते गांडूळ खत व पाला- पाचोळा यांचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक दिनेश धायगुडे यांनी प्रस्ताविक कृषी सहायक अतुल हिंगणे यांनी तर माधवी नाळे यांनी आभार मानले.