महारेराकडून विकसकांना स्व-नियंत्रणाचा सल्ला

विकसकांच्या संघटना सदस्यांची जबाबदारी घेण्याची अपेक्षा

पुणे – महाराष्ट्रातील रिअल इस्टेट नियंत्रक महारेराने विकसकांना स्व-नियंत्रणाचा सल्ला दिला आहे. यासाठी महारेरा स्व-नियंत्रक संस्था सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझजेशन (एसआरओ) निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे अधिक पारदर्शकता आणि व्यावसायिकता येईल, असे महारेराला वाटते. त्याचबरोबर ही पद्धत रुढ झाल्यास रिऍल्टी संबंधातील इतर क्षेत्रातही पारदर्शकता येईल आणि बरेच प्रश्‍न कमी होतील, अशी महारेराची अपेक्षा आहे.

ही कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी महारेरा नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सील म्हणजे नॅरडेको, कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे क्रेडाई आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री म्हणजे एमसीएचआय स्वतःला एसआरओ म्हणून नोंदणी करण्यास सांगणार आहेत. या संस्थांनी स्वतःला एसआरओ म्हणून नोंद केल्यास या संस्था आपल्या सदस्यांना महारेराच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे उत्तरदायित्व स्वतःकडे घेतील. त्यामुळे सर्वच विकसक कमी कालावधीत महारेराशी जोडले जाऊ शकतील. मात्र, हे काम कधी पूर्ण करणार याबाबत कोणताही कालावधी निश्‍चित केलेला नाही.

नोंदणी विभागाबरोबर सहकार्याने काम
महारेरा महसूल खात्याच्या नोंदणी विभागाबरोबर सहकार्याने काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. यांतर्गत महारेरा आपल्या पोर्टलवर प्रकल्प आणि ग्राहकासह एक हायपरलिंक उपलब्ध करणार आहे. एखाद्या प्रकल्पावर क्‍लिक केल्यानंतर त्याचबरोबर निबंधकाच्या वेबसाईटला जोडले जाऊन विशिष्ट प्रकल्प कोणाच्या नावावर नोंदणी झालेला आहे, याची माहिती मिळेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे क्षेत्र अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याचा यामागे हेतू असल्याचे सांगितले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.