Ramayana Advance Booking : रामायणाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात; तिकीट दर पाहून चाहते थक्क
Ramayana Advance Booking : विशेष म्हणजे, मुंबईतील काही चित्रपटगृहांमध्ये प्रीमियम सीट्सच्या तिकिटांचे दर तब्बल २ हजार पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

Ramayana Advance Booking : गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला ‘रामायण’ हा भव्य चित्रपट अखेर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून, पहिल्या दिवसाच्या शोसाठी तिकीट खरेदी करण्याकडे चाहत्यांचा कल दिसत आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील काही चित्रपटगृहांमध्ये प्रीमियम सीट्सच्या तिकिटांचे दर तब्बल २ हजार पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत
‘रामायण’मध्ये अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत साई पल्लवी माता सीतेच्या, यश रावणाच्या, सनी देओल हनुमानाच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दमदार कलाकारांची फळी आणि भव्य निर्मितीमुळे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेला हा चित्रपट आहे.
पहिल्या दिवसाच्या तिकीट विक्रीतून कोट्यवधींची कमाई?
चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगबाबत समोर आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, पहिल्या दिवसाच्या तिकीट विक्रीतून सुमारे ८.१६ कोटी रुपयांची कमाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
ही आकडेवारी SACNILC च्या प्राथमिक नोंदींवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अद्याप काही दिवस बाकी असतानाच तिकीट विक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहता, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच त्याच्या प्रत्यक्ष कमाईचे चित्र स्पष्ट होईल.
सहा भाषांमध्ये होणार प्रदर्शित
‘रामायण’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम होणार?
भव्य बजेट, लोकप्रिय कलाकार, रामायणासारखा विषय आणि अॅडव्हान्स बुकिंगबाबत समोर येणारे आकडे यामुळे ‘रामायण’कडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





