Adv. Ujjwal Nikam: आर्थिक गुन्हे रोखण्यात सीएंची भूमिका निर्णायक
Adv. Ujjwal Nikam:

ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन
Adv. Ujjwal Nikam: आर्थिक पारदर्शकता टिकवणे आणि गुंतागुंतीच्या आर्थिक गैरव्यवहारांना वेळीच रोखणे हे आजच्या सनदी लेखापालांचे (सीए) प्रमुख कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेने आयोजित सह्याद्री या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनात ते बोलत होते. बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक भवनमध्ये पार पडलेल्या या परिषदेत आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, अभिषेक धामणे तसेच राजेश अग्रवाल, प्रणव आपटे, नीलेश येवलेकर, नेहा फडके, नंदकुमार कदम, सारिका दिंडोकर, प्रज्ञा बंब, शंभूराजे सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
बदलत्या अर्थव्यवस्थेत सीएंचे काम केवळ हिशेब तपासणीपुरते मर्यादित नसून ते कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे रक्षक आहेत, असे निकम म्हणाले. पांढरपेशा गुन्हेगारी, बोगस कंपन्या, मनी लाँडरिंग आणि सायबर फसवणूक उघड करण्यात सीए व कायदेतज्ज्ञांचा समन्वय महत्त्वाचा ठरतो.
फॉरेन्सिक ऑडिटिंगमध्ये मोठी संधी असून विद्यार्थ्यांनी कायदा, करप्रणालीचे बदल, संवाद कौशल्य आणि नैतिकता जपावी, असा सल्ला त्यांनी दिला. संवाद सत्रात त्यांनी १९९३ बॉम्बस्फोट, कसाब आणि अबू सालेम खटल्यातील अनुभव सांगितले.




