कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. प्रल्हाद कोकरे, उपाध्यक्षपदी सीए यशवंत कासार

पुणे – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट शेडयूल्ड बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक ॲड. प्रल्हाद कोकरे यांची, तर उपाध्यक्षपदी सीए यशवंत कासार यांची गुरूवार, २६ डिसेंबर २०२४ रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. कॉसमॉस बँकेच्या २०२५ ते २०२९ या कार्यकाळासाठी नुकतीच बिनविरोध निवडणूक झाली.
अध्यक्ष अॅड. प्रल्हाद कोकरे हे गेली २० वर्षे बँकेच्या संचालक मंडळावर असून ते एक यशस्वी प्रशासक आणि राज्य सरकारच्या सहकार विभागात सहनिबंधक सहकारी संस्था या पदावरून निवृत्त झाले आहेत. सन २०१९-२० आणि २०२० – २१ या दोन वर्षात ते बँकेचे उपाध्यक्ष होते. नोव्हेंबर २०२४ पासून ते बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. गेल्या २० वर्षात संचालकांच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत.
उपाध्यक्ष सीए यशवंत कासार हे सनदी लेखापाल असून इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् ऑफ इंग्लंड अँड वेल्स्चे सदस्य आहेत. तसेच सर्टिफाईड इन्फर्मेशन सिस्टीम ऑडिटर, सर्टिफाईड इन गव्हर्नन्स् ऑफ एंटरप्राईज आयटी (सीजीईआयटी), प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल आणि असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल अकाउंटंटस् लंडन येथील फेलो सदस्य आहेत. सीए कासार इंन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे २०१९-२५ या कालावधीसाठी प्रादेशिक परिषद सदस्य आहेत. कर, कायदे व वित्त क्षेत्रातील तज्ञ आहेत. सन २०१९ पासून कॉसमॉस बँकेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. सीए कासार हे चार्टर्ड अकाउंटंट इन को-ऑपरेटीव्ह बँक्स (सीएसीओबी) चे सचिव आहेत.





