Tukaram Mundhe : जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ? एक फोन करा, तुकाराम मुंढे थेट ॲक्शन घेणार!
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतल्यानंतर या मोहिमेला वेग आला आहे.

Tukaram Mundhe : राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) व्यापक कारवाई सुरू केली आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यभरात 203 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून 102 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 68 दुकाने आणि हॉटेल्सवर कारवाई करून ती बंद करण्यात आली आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतल्यानंतर या मोहिमेला वेग आला आहे. प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या उत्पादन, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
तुकाराम मुंढे यांनी आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. आता गुटखा, पानमसाला तसेच अन्न व औषधांबाबतच्या तक्रारी नागरिकांनी थेट प्रशासनापर्यंत पोहचवता येणार आहेत. यासाठी टोल-फ्री क्रमांक आणि ई-मेलद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा : लक्षवेधी : पर्यावरण रक्षणासाठी ‘व्यासपीठ’
गेल्या काही महिन्यांत अन्न व औषध प्रशासन विभागावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रशासनात शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. 25 मे रोजी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधातील कारवायांना अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरून सापळा रचून मोठी कारवाई
दरम्यान, आयुक्त मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 4 मे रोजी धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक रोखत अन्न व औषध प्रशासनाने सुमारे 18 लाख 50 हजार रुपयांचा साठा जप्त केला. मुंबई-आग्रा महामार्गावरून हा माल वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहनचालक सुरेश कुमार गोवरिया (रा. राजस्थान) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम मुंढे हे डॅशिंग आणि शिस्तप्रिय आयएएस (IAS) अधिकारी आहेत. २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल २५ वेळा त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या कामाच्या धडाडीमुळे आणि भ्रष्टाचाराविरोधातील कठोर कारवाईमुळे त्यांना वारंवार या बदल्यांचा सामना करावा लागला आहे.
अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर-
टोल फ्री क्रमांक : 1800222365
ई-मेल : [email protected]
हेही वाचा : Koregaon crime : कोरेगाव तालुक्यात खळबळ! परतवडीत पाणीवाटपाच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी




