पिंपरी | शालेय साहित्य वितरणासाठी ई-रुपी प्रणालीचा अवलंब

पिंपरी, (प्रतिनिधी) – सर्व शैक्षणिक सुविधांसह दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महापालिका कटीबद्ध असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा परिपूर्ण लाभ मिळावा आणि शालेय साहित्याचे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पध्दतीने वितरण करण्यासाठी ई-रुपी कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
त्यानुसार येत्या १० दिवसात महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप महापालिकेच्या वतीने करण्यात येते. त्यासाठी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा अवलंब करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शालेय साहित्याचे वाटप करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण पद्धती अंतर्गत ई-रुपी कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन श्रीमती लिलाबाई कांतीलाल खिंवसरा प्राथमिक विद्यालय मोहननगर, चिंचवड येथे आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते आज पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापक रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
आयुक्त सिंह म्हणाले, महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना वितरित केल्या जाणा-या शालेय साहित्याच्या दर्जाच्या बाबतीत तक्रारी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून मागील वर्षापर्यंत शालेय साहित्याची रक्कम थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने पालकांच्या खात्यावर वितरीत केली जात होती.
त्यातही त्रुटी आढळून आल्याने महापालिकेने शैक्षणिक शालेय साहित्याचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा परिपूर्ण लाभ मिळावा आणि या प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी थेट लाभ हस्तांतरण पद्धती अंतर्गत ई-रुपी या नवीन कार्य पद्धतीचा अवलंब केला आहे.
तसेच नवीन प्रणाली अंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व शालेय साहित्याचा दर्जा महापालिकेने तपासून घेतला असून येत्या १० दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
कशी आहे ई-रुपी प्रणाली?
थेट लाभ हस्तांतरण ई-रुपी पद्धती अंतर्गत शालेय साहित्याच्या वितरणासाठी पालकांद्वारे विद्यार्थ्याच्या संबंधित शाळेमध्ये अद्ययावत मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्यात आली आहे. बँकेमार्फत या मोबाइल क्रमांकावर क़्यूआर कोड संबंधित लिंक असलेला संदेश पाठविण्यात येतो. या लिंकद्वारे मोबाइलमध्ये क़्यूआर कोड जनरेट करण्यात येतो.
पालकांनी हा क़्यूआर कोड महापालिकेने निश्चित केलेल्या पुरवठादाराकडे सादर करायचा आहे. शालेय साहित्य पुरवठादाराकडून क़्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पालकांच्या मोबाईल क्रमांकवर ओटीपी जातो.
हा ओटीपी पालकांनी पुरवठादारास सादर केल्यानंतरच विद्यार्थ्यांना दप्तर, बुट, सॉक्स, पीटी बुट, कंपास पेटी, फुट पट्टी, वह्या, स्वाध्यायमाला, प्रात्याक्षिक पुस्तिका, चित्रकला वही, नकाशा पुस्तिका, रेनकोट, स्टीलची पाण्याची बॉटल आदी साहित्य दिले जाते.





