जांबूत – “बिबट-मानव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता जपत वनविभागासोबत संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे. सजग निर्णय घेतल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी आपण एक पाऊल सहजीवनाकडे टाकणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन जुन्नर वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी केले. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे आयोजित मानव–वन्यप्राणी संघर्ष कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी वनविभागात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सुवर्णपदक प्राप्त झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने स्मिता राजहंस यांचा भव्य सत्कार करण्यात आला. राजहंस पुढे म्हणाल्या की, “जुन्नर वनविभागाच्या इतिहासात भूतो न भविष्यती ठरलेले ‘शूट आऊट ऑपरेशन’ पिंपरखेड येथूनच राबविण्यात आले. प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे तब्बल ४७ बिबट जेरबंद करण्यात यश आले.” पिंपरखेड आणि जांबूत येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन उभारले होते. या आंदोलनाची दखल शासनाने घेतल्याने कारवाईला गती मिळाली. वाइल्ड लाइफ टीम, शार्प शूटर पथक, पिंजरे आणि अन्य साधनसामग्री उपलब्ध झाल्याने बिबट पकड मोहीम प्रभावीपणे राबविता आली, असेही त्यांनी सांगितले. तथापि, या परिसरात अजूनही बिबट्यांची संख्या मोठी असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिल सहारे, सौमित्र तिजारे आणि राकेश निमसरकार यांनी विविध कलाकारांच्या माध्यमातून बिबट प्रतिबंधक उपाययोजनांची प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनरक्षक लहू केसकर, महेंद्र दाते, बेस कॅम्प टीमचे कर्मचारी, शिरूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बोंबे, रामदास बराटे, जयवंत बोंबे, देवराम ढोमे, शिवाजी वरे, बाळासाहेब बोंबे, गणेश बोंबे, आबाजी पोखरकर, प्रफुल्ल बोंबे, सचिन बोंबे, नरेंद्र बोंबे, रवींद्र बोंबे, विलास बोंबे, शिक्षिका प्रियांका दाभाडे, प्रियांका येवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.