प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई – राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. करोना स्थिती, करोना विषाणूचा दुसरा प्रकार व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदीबाबत त्यांनी आढावा घेतला.
करोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे. आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवर करोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नवीन प्रकारच्या करोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्कफोर्सने अभ्यास करावा, असेही त्यांनी सांगितले.
“माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी असलेल्या लोकांचा राज्यभरातील डेटा आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा आणि त्यांना सतर्क करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मास्क वापरल्याने करोना विषाणूच्या प्रसाराला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिबंध होतो. त्यामुळे राज्यातील जनतेला मास्क वापरण्यासाठी बंधनकारक करावे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आजपासून रात्रीची संचारबंदी…
आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अनावश्यक रहदारी टाळावी, असे आवाहन करतानाच आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले प्रवासी देशांतर्गत प्रवास करुन महाराष्ट्रात येतात.
विविध राज्यातून येणाऱ्या अशा प्रवाशांकडे लक्ष द्यावे. त्यांच्याबाबतीत जागरूकता ठेवावी. त्यासाठी दिल्लीसह इतर राज्यांशी, प्रशासनाशी समन्वय साधावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी करोना लसीकरणाच्या तयारीचा आढावाही घेतला.





