प्रभात वृत्तसेवा जेजुरी – भेसळयुक्त भंडारा विक्रीबाबत अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी ॲक्शन मोडवर आले असून प्रशासनाचे वर्षा बारवकर, रजिया शेख, लक्ष्मीकांत सावळे, डॉ. संदीप शिंदे आदी अधिकारी- कर्मचारी यांनी (दि.२२) जेजुरीत दाखल होत मुख्य महाद्वार व शहरातील विक्रेत्यांकडील भंडाऱ्याची तपासणी करीत काही नमुने ताब्यात घेतले. यावेळी बेळगाव येथून विक्रेत्यांना भंडारा पुरवठा करणारा टेम्पो ताब्यात घेतला आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, कर्मचारी अण्णासाहेब देशमुख व पोलीस पथक हे कारवाईत सहभागी झाले होते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.रविवारी (दि.२१) नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीवर भंडारा अर्पण करून नतमस्तक होण्यासाठी गेले होते. यावेळी पहिल्या पायरीच्या वेशीवरून काही उत्साही कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची उधळण केली. अचानक भंडाऱ्याचा मोठा भडका उडाला होता. घटनेत दोन नवनिर्वाचित नगरसेविकासह सुमारे १६ जण होरपळले होते. त्यांच्यावर शासकीय, तसेच जेजुरी व पुणे येथे उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. काही जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे. काही वर्षांपासून ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी यांच्याकडून भेसळयुक्त भंडाऱ्याबाबत सतत तक्रारी करण्यात येत आहेत. जत्रा, यात्रा, उत्सव नियोजन बैठकीत प्राधान्याने भेसळयुक्त भंडारा विक्री रोखण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. २०२१-२२ दरम्यान मागील काळातील विश्वस्त मंडळाने अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे औंध (पुणे) येथील कार्यालयात निवेदन देत आवाहन केले होते. आठ महिन्यांपूर्वी माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे, पत्रकार प्रकाश फाळके यांनी अन्न व औषध भेसळ प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची मुंबई येथे भेट घेत भेसळयुक्त भंडारा विक्रीवर विभागाकडून प्रतिबंध घालण्यात यावा, उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी प्रशासनाकडून कारवाई केली नाही. १० वर्षांपासून प्रभात चा पाठपुरावा कुलदैवत खंडेरायाच्या धार्मिक विधींमध्ये भंडाऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे. राज्यातुन येणारा भाविकभक्त देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भंडारा आणि खोबरे विकत घेतो. देवाच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्रद्धेने कपाळी लावतो. उधळण करतो. काही भाविक ‘देवाचे लेणे’ म्हणून भक्षणही करतात. मात्र, काही वर्षांपासून सोनपिवळ्या भंडाऱ्याला भेसळीचे ग्रहण लागले आहे. केमिकल, माती, रांगोळ मिश्रित भंडाऱ्यामुळे कपाळ, त्वचा काळी पडणे, त्वचेवर लालसर व्रण उमटणे, डोळे चुरचुरणे, असा त्रास भाविकांना होतो तर ऐतिहासिक गडाच्या दगडांवर सुद्धा परिणाम होत असल्याचे पुरातत्व खात्याने नमूद केले होते. याबाबत दै. प्रभातमधून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. दरम्यान, मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.