Pimpri : ‘नाव समिती’समोर प्रशासनाचे हात वर! अभिप्राय देण्याऐवजी निर्णय समितीवरच ढकलला
Pimpri: नगरसेवकांकडून विविध रस्ते, चौक व इतर सार्वजनिक ठिकाणांना नावे देण्याबाबतचे प्रस्ताव नाव समितीकडे दाखल

Pimpri : महापालिका हद्दीतील रस्ते, चौक, उड्डाणपूल, उद्याने व वास्तूंना नावे देण्याच्या प्रस्तावांवर अभिप्राय देण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे समोर आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांकडून माहिती उपलब्ध नाही, अंतिम निर्णय नाव समितीनेच घ्यावा, असा अभिप्राय दिला जात असल्याने नाव समितीच गोंधळात पडली आहे.
प्रचलित पद्धतीनुसार प्रशासनाने वस्तुनिष्ठ शिफारस करणे अपेक्षित असताना निर्णयाची जबाबदारी समितीवर ढकलली जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. नगरसेवकांकडून विविध रस्ते, चौक व इतर सार्वजनिक ठिकाणांना नावे देण्याबाबतचे प्रस्ताव नाव समितीकडे दाखल होत आहेत. नियमानुसार नाव समितीकडून हे प्रस्ताव संबंधित विभागांकडे अभिप्रायासाठी पाठविले जातात.
संबंधित खात्याने प्रत्यक्ष पाहणी करून अथवा संबंधित ठिकाणाला यापूर्वी नाव देण्यात आले आहे का, याची खात्री करून समितीला स्पष्ट अभिप्राय देणे अपेक्षित असते. महापालिका निवडणुकीनंतर नवीन सभासद आल्याने नाव समितीकडे जवळपास १०० हून अधिक नावासाठीचे प्रस्ताव आले आहेत.
ते नियमानुसार क्षेत्रीय कार्यालयांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यानुसार, प्रत्यक्ष जागेवर जाऊन आणि क्षेत्रीय कार्यालयाकडील कागदपत्रांमध्ये या नावांचा शोध घेण्याऐवजी विविध क्षेत्रीय कार्यालयांकडून माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे अंतिम निर्णय नाव समितीने घ्यावा, असा अभिप्राय दिला जात आहे. त्यामुळे प्रस्तावांबाबत निर्णय घेताना समितीसमोरच पेच निर्माण होत आहे.
चौकांची नोंदच नाही
कर्वेनगर-हिंगणे परिसरातील आचार्य सोसायटीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील परिवार मार्टसमोरील चौकाला युवा एकी चौक असे नाव देण्याची सूचना सभासद राजेश बराटे यांनी केली होती.
या प्रस्तावाला रेश्मा बराटे व तेजश्री पवळे यांनी अनुमोदन दिले. या प्रस्तावावर अभिप्राय मागविल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने या चौकाला यापूर्वी नाव दिल्याची माहिती उपलब्ध नाही. अंतिम निर्णय नाव समितीमार्फत घेणे आवश्यक आहे, असा अभिप्राय दिला.
जुना रस्ता असूनही माहिती नाही
त्याचप्रमाणे एरंडवणा येथील सर्व्हे क्रमांक १५ मधील सत्यवादी, मित्रसदन व वेणूताई सोसायटीसमोरील रस्त्यास स्व. काळूराम बाबुराव तथा के. बी. पवार पथ असे नाव देण्याची सूचना सभासद पुनीत जोशी व मिताली सावळेकर यांनी केली होती.
मंजुश्री खर्डेकर व सुनील पांडे यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले. या प्रकरणातही संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने या रस्त्याला यापूर्वी नाव दिल्याची माहिती उपलब्ध नाही. अंतिम निर्णय नाव समितीमार्फत घेणे आवश्यक आहे, असाच अभिप्राय नोंदविला आहे. प्रत्यक्षात हा शहरातील मध्यवर्ती भाग आहे. तसेच, या पूर्वी नाव दिले असण्याची शक्यता आहे





