NASHIK : आदिवासी विद्यार्थ्यांचे 13 दिवसांचे उपोषण अखेर मागे; 3 अधिकाऱ्यांचे निलंबन, कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
NASHIK : नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे १३ दिवसांचे उपोषण अखेर मागे घेण्यात येणार आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन, कुटुंबीयांना ५ लाखांची मदत.

NASHIK : नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केलेले उपोषण अखेर मागे घेण्यात येणार आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी प्रशासनाने आज तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. तसेच पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना आदिवासी विकास विभागाकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज १७वा दिवस असून, उपोषणाचा १३वा दिवस आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेली आश्वासने, तीन अधिकाऱ्यांवरील कारवाई आणि कुटुंबीयांना देण्यात आलेली आर्थिक मदत यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांकडून उपोषण मागे घेण्यात येणार आहे. मात्र, उपोषण मागे घेतले असले तरी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका आदिवासी विद्यार्थी आंदोलकांनी घेतली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनी सृष्टी सूर्यवंशी हिच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुविधा, वेळेवर उपचार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी नाशिकमध्ये आंदोलन सुरू केले होते. आज आंदोलनाचा १७वा, तर उपोषणाचा १३वा दिवस होता.
प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केले असून, मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना आदिवासी विकास विभागाकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.





