Aditya Thackeray: हिंजवडीत आयटी अभियंत्यांचा एल्गार; आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी
Aditya Thackeray: देशातील प्रमुख आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी-माण परिसरातील विविध समस्यांविरोधात आज आयटी अभियंते, स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले.

Aditya Thackeray: देशातील प्रमुख आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी-माण परिसरातील विविध समस्यांविरोधात आज आयटी अभियंते, स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हिंजवडीत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
हिंजवडीतील भीषण वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, वारंवार होणारे अपघात, अपुऱ्या पायाभूत सुविधा तसेच पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
दररोज लाखो कर्मचारी ये-जा करत असलेल्या या परिसरात मूलभूत सुविधांसाठी आंदोलन करण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेही सहभागी झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून हिंजवडीतील विविध समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हिंजवडीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच येथील प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी त्यांनी केली.
हिंजवडीतील समस्या केवळ स्थानिक नागरिकांपुरत्या मर्यादित नसून, त्या राज्याच्या आयटी क्षेत्राच्या आणि औद्योगिक विकासाशी संबंधित आहेत. त्यामुळे सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.




