आदित्य ठाकरेंनी केला सवाल अन् संजय गायकवाड उत्तर देत म्हणाले,” हो, गुवाहाटीचा खर्च मी केला”

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेल्या शिंदे गटातील आमदारांना गुवाहाटीचा खर्च कोणी केला असा थेट सवाल करत त्याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे असे म्हटले होते. दरम्यान, त्यांच्या या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय गायकवाड बुलढाण्यात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. आदित्य ठाकरेंनीगुवाहाटीला गेल्यानंतरचा तिथला खर्च कोणी केला असा सवाल केला असता संजय गायकवाड यांनी, ‘गुवाहाटीचा खर्च मी केला होता’ असे म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, ‘शासन आपल्या दारी आणि थापा मारतय भारी’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर बोलताना गायकवाड यांनी , उद्धव ठाकरेंना कोटी करण्याशिवाय दुसरा धंदा नाही. अडीच वर्षात तुम्ही घरात बसून होते. तुम्ही शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना काय दिलं? असा सवाल गायकवाड यांनी केला. किमान आम्ही देतोय याचे कौतुक तरी करा” असे म्हटले.
बच्चू कडू यांना इंडिया आघाडीत सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, बच्चू कडू संघर्षातील दिवा आहे. लोकांशी नाळ जुळलेला पदाधिकारी आहे. ते कोणाच्या हाताखाली काम करु शकत नाही. त्यांनी मंत्रीपदाची आशा सोडली असल्याचे गायकवाड म्हणाले.
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी इंडिया आघाडीवर देखील टीका केली. असे कितीही विरोधी पक्ष नेते एकत्र आले तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करु शकत नाही. हे मनाने हरलेले आणि शरीराने थकलेले किती दिवस टिकणार अशी खोचक टीका संजय गायकवाड यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांवर केली आहे.
रविवारी म्हणजे 3 ऑगस्ट रोजी बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार बुलढाण्यात येणार आहेत. या कार्यक्रमस्थळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डीक्कर आत्मदहनाचा प्रयत्न करु शकतात. त्यामुळे प्रशांत डीक्कर यांना शोधून काढण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर असणार आहे.





