भोर – पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरी भागातील कोंढरी गावातील एका साध्या मजुराच्या मुलीने स्वप्नवत यश मिळवले आहे. निगुडघर येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीत शिकणाऱ्या आदिती पारठे हिची अमेरिकेतील प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ला भेट देण्यासाठी निवड झाली आहे. तब्बल १६,१२१ विद्यार्थ्यांमधून तिने ही संधी मिळवत आपला ठसा उमटवला आहे. या यशामुळे कोंढरी गावासह संपूर्ण भोर तालुका आणि पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांतर्गत, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २५ विद्यार्थ्यांना नासाला भेट देण्याची संधी दिली जाते. यंदा या उपक्रमासाठी १६,१२१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहावी आणि सातवीतील विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा, ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत या तीन कठीण टप्प्यांमधून यशस्वी होणे आवश्यक होते. या सर्व चाचण्या उत्तीर्ण करत आदितीने आपली क्षमता सिद्ध केली. “मी खूप मेहनत घेतली. लेखी आणि ऑनलाइन परीक्षेनंतर मुलाखतीसाठी निवड झाल्यावर खूप आनंद झाला. आता नासामध्ये जाऊन अंतराळ संशोधन आणि शास्त्रज्ञांना भेटण्याची उत्सुकता आहे,” असे आदितीने उत्साहाने सांगितले. आदितीचे आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना आपल्या मुलीच्या यशाचा प्रचंड अभिमान आहे. “आमच्या घरातील कुणी विमानतळही पाहिलेलं नाही. पण आमची मुलगी आता सातासमुद्रापार नासाला जाणार आहे. हे स्वप्नवत आहे,” असे तिच्या कुटुंबीयांनी भावुक होत सांगितले. “आदितीने शिक्षणाच्या जोरावर मोठं व्हावं, ही आमची इच्छा आहे,” असेही त्यांनी नमूद केले. कोंढरी गावातील ग्रामस्थांना आदितीच्या या यशाचा मनापासून आनंद आहे. “दुर्गम डोंगरी भागातून येऊन अशी संधी मिळवणारी आदिती आमच्यासाठी प्रेरणा आहे,” असे गावकऱ्यांनी सांगितले. शिक्षणतज्ज्ञांनीही या यशाचे कौतुक करत जिल्हा परिषदेच्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून देणे ही शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी महत्त्वाची बाब आहे,” असे त्यांनी म्हटले.आदितीच्या या यशाने भोर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये नव्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. एका साध्या घरातील मुलीने मिळवलेले हे यश संघर्षातून यशस्वी होण्याचा आदर्श ठरले आहे. आदिती आता नासामध्ये अंतराळ संशोधनाच्या विश्वात पाऊल ठेवण्यास सज्ज आहे, आणि तिची ही गगनभरारी अनेकांना प्रेरणा देणारी ठरेल, यात शंका नाही.