Aditi Tatkare : आणखी 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र? मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत घुसघोरी केलेल्या महिलांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. ज्या महिला पात्र नाहीत तरही या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांचा सरकार मार्फत वेगवेगळ्या मार्गाने शोध घेतला जात आहे. त्यात आणखी 26 लाख महिलांची भर पडली असून याची स्थानिक पातळीवर छाननी होणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली. आदिती तटकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नाहीत. याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. ही यादी महिला व बालविकास मंत्रालयाला प्राप्त झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे. छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल.
तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरु राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, येत्या काळात या 26 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता आहे. शिवाय जे पात्र नाहीत आणि त्यांनी लाभ घेतला आहे अशांकडून पैसे वसूल केले जातील, असेही सरकारने सांगितले होते.





