आदिनाथ कोठारे नव्या भूमिकेत; ‘डिटेक्टिव धनंजय’चा प्रोमो रिलीज, चाहत्यांची उत्सुकता वाढली

Adinath Kothare : मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आता बॅालिवूडमधील अनेक मोठ्या सिनेमातून झळकत आहेत. इतर भाषिक सिनेमा, वेबसिरीज अनेक ठिकाणी आता मराठी कलाकार आपल्या कामाचा ठसा उमटविताना दिसत आहेत. नुकतीच एका मोठ्या मराठी वेबसिरीजची घोषणा करण्यात आली असून, या वेबसिरीजमध्ये मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारेचा लूक समोर आला आहे.
नुकताच या वेबसिरीचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमधील आदिनाथचा लूक विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘झी ५ मराठी ओरिजिनल्स’ अंतर्गत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक गूढ वेबसिरीज येणार आहे. या वेबसिरीजचे नाव डिटेक्टिव धनंजय असून या वेबसिरीजमध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याचा लूक व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षक या वेबसिरीजच्या रिलीजसाठी उत्सुक झाले आहेत.
View this post on Instagram
महत्वाचे म्हणजे या वेबसिरीजमध्ये आदिनाथ अभिनेता आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेबसिरीजची कथा एका कादंबरीवर आधारित आहे. प्रसिद्ध लेखक बाबूराव अर्नाळकर यांच्या कादंबरीतील लोकप्रिय पात्र धनंजय या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.
आदिनाथची करारी नजर आणि त्याचे गुप्तहेर कौशल्ये यातून हे रहस्य कसे उलगडणार, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या वेबसिरीजबद्दल आदिनाथ कोठारे देखील उत्सुक असून, आगामी काळात ‘रामायण’ आणि ‘गांधी’सारख्या मोठ्या बॉलिवूड प्रॉजेक्ट्सचा महत्त्वाचा भाग आदिनाथ असणार आहे.
हेही वाचा : दिवाळीच्या मुहूर्तावर नागिन फेम अभिनेत्रीची कार खरेदी! इंन्स्टाग्रामवर खास फोटो केले शेअर





