Adinath kothare: “चित्रपट-ओटीटीनंतर आदिनाथ कोठारेची टेलिव्हिजनवर एन्ट्री; ‘या’ मालिकेत साकारणार प्रमुख भूमिका”

Adinath kothare: अभिनेता आदिनाथ कोठारे लवकरच छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नव्याने सुरू होणाऱ्या ‘नशीबवान’ या मालिकेत तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. यात त्याच्यासोबत नेहा नाईक, अजय पूरकर आणि सोनाली खरे यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. ही मालिका येत्या १५ सप्टेंबरपासून दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
या मालिकेत आदिनाथ ‘रुद्रप्रताप घोरपडे’ ही भूमिका साकारत आहे. ही भूमिका त्याच्यासाठी ड्रीमरोल असल्याचे तो म्हणतो. आपल्या पहिल्या दैनंदिन मालिकेबद्दल आदिनाथने आनंद व्यक्त करताना सांगितले,
“गेल्या अनेक वर्षांपासून मालिकेत काम करण्याचा विचार होता. शेवटी ‘नशीबवान’ मालिकेमुळे तो योग जुळून आला. टीव्ही हे फक्त माझंच नाहीतर प्रत्येकाचं आवडतं माध्यम आहे. मालिकेमुळे तुम्ही घराघरांत पोहोचता, प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता. ‘नशीबवान’ची कथा अतिशय सुंदर आहे. रुद्रप्रताप या भूमिकेला अनेक पदर आहेत, जे हळूहळू उलगडत जातील.”
चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता छोट्या पडद्यावर झळकण्याचा अनुभव वेगळाच असल्याचे तो म्हणतो.
“चित्रपट-ओटीटीमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आणि आता रोज त्यांना भेटणं, ही भावना खरंच कमाल आहे. यापूर्वी निर्माता म्हणून मालिकांमध्ये काम केलं आहे, पण अभिनेता म्हणून छोट्या पडद्यावर अनुभव घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या नशिबाने दिलेली ही खरी ‘नशीबवान’ संधी आहे,” असं आदिनाथने सांगितलं.
स्टार प्रवाहसोबतच्या नात्याबद्दल बोलताना आदिनाथ म्हणाला “निर्माता म्हणून कोठारे व्हिजनची पहिली मालिका स्टार प्रवाहसोबत केली होती. त्यानंतर अनेक सुपरहिट मालिका आम्ही या वाहिनीबरोबर दिल्या. आता पुन्हा एकदा या वाहिनीवर प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांना भेटतोय याचा खूप आनंद आहे. मालिकेतले दिग्गज कलाकार, सुंदर कथा आणि गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात सुरू होणारी ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनात घर करेल, याची मला खात्री आहे.”
गणेशोत्सवाच्या धामधुमीत प्रेक्षकांना ‘नशीबवान’ ही नवीन मालिका भेट म्हणून मिळणार आहे. आदिनाथ कोठारेच्या या छोट्या पडद्यावरील एन्ट्रीला प्रेक्षक किती दाद देतात, हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.





