मुंबई – क्रिती सेनन, सैफ अली खान आणि सनी सिंग स्टारर “आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर गांधी जयंतीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेता प्रभास श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच यात सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनन दिसत असून, सनी सिंग लक्ष्मणची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात मोठी आणि चांगली स्टारकास्ट आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. पण दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटावरून बराच वाद झाला निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.
आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाकडे उत्तर मागितले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ‘आदिपुरुष’ चित्रपटाविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला नोटीस बजावली आहे. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार आहे. कुलदीप तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सरन्यायाधीश राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती बीआर सिंग यांच्या खंडपीठाने आदेश दिला.
“चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न घेता आदिपुरुष चित्रपटाचा प्रोमो रिलीज केला होता, जे नियमांचं स्पष्ट उल्लंघन आहे. असं यामध्ये म्हंटलं आहे. तसेच, चित्रपटात राम, सीता आणि रावणाच्या भूमिका साकारणारे कलाकार प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, तसेच हनुमानाची भूमिका साकारणारा देवदत्त नागे आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारा सनी सिंग यांच्या लूकवर आणि कपड्यांवरही याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट कायदाच्या कचाट्यात अडकणार असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय आदिपुरुष चित्रटाचे दिग्दर्शक ओम राऊतवरही याचिकेत तक्रार करण्यात आली आहे.