कांगारूंच्या देशात : खेळपट्टी कसोटीसाठीच होती का?

-अमित डोंगरे
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदजीला पोषक असतात हे सातत्याने सांगितले जाते. मात्र, गेल्या पाच-सात वर्षांत तेथे देखील पाटा खेळपट्ट्या दिसून आल्या आहेत. मात्र, पहिल्या कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी नक्की कसोटी सामना डोळ्यांसमोर ठेवूनच तयार करण्यात आली आहे का, असाच प्रश्न पडला आहे.
या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी अत्यंत बेजबाबदार फलंदाजी केली हे नाकारता येणारच नाही पण दोन्ही संघाच्या गोलंदाजांना या खेळपट्टीकडून जरा जास्तच मदत मिळाली असे वाटते. क्रिकेटचा सामना कोणताही असो फलंदाजांसाठी जास्त वाव ठेवावा लागतो तरच तो पाहिला जातो.
या सामन्यात पहिल्या दिवशी सहा गडी बाद झाले होते तेव्हा खेळपट्टीचे स्वरुप कोणीही लक्षात घेतले नाही. पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 15 गडी बाद झाले आणि खेळपट्टीच्या स्वरूपावर चर्चा सुरू झाल्या. या मैदानाचे क्युरेटर डॅमियन हॉग यांनी ही खेळपट्टी पारंपरिक खेळपट्टी असल्याचे सामना सुरू होण्यापूर्वी सांगितले होते. मात्र, ही खेळपट्टी कसोटीसाठी आहे का असा प्रश्न पडला आहे. सामन्याच्या केवळ दुसऱ्या दिवशी जर 15 फलंदाज बाद होत असतील तर पुढील कसोटी सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे असे वाटते.
हिवाळ्याच्या दिवसात असलेले थंड वारे तसेच खेळपट्टीवर थोडे गवत आणि त्यावर पडणारे दव यांचा वेगवान गोलंदाजांना लाभ झाला. स्टार्क, कमिन्स, जोश हेझलवूड, बुमराह व यादव यांनी घेतलेले बळी पाहिले तर त्यांनी खेळपट्टीच्या मदतीने तसेच स्विंगमुळे वर्चस्व गाजवले. या उलट लायन व अश्विनला मात्र, खेळपट्टीने समर्थन दिल्याप्रमाणे मदत केली म्हणूनच ते यशस्वी ठरले. या खेळपट्टीची पहिल्या दिवशी पाहणी केली तेव्हा क्रॅक विस्तारलेल्या नव्हत्या. मात्र, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवसाची खेळपट्टी पाहिल्यावर असा प्रश्न पडला की ही खेळपट्टी ऍडलेड ओव्हलची आहे का चेन्नई किंवा दिल्लीची.
स्टिव्ह स्मिथला अश्विनने टाकलेला चेंडू फिंगरस्पीनमुळे नव्हे तर खेळपट्टीच्या करामतीमुळे वळला हे अश्विनही नाकारणार नाही. खरेतर ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी ही टिपीकल ऑस्ट्रेलियन खेळपट्टी नव्हती तरीही सामना अडीच दिवसांतच संपला. या खेळपट्टीवर हा सामना निश्चितच निकाली निघेल हे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले होते. फक्त पुढील सामने ज्या मैदानांवर होणार आहेत, तेथील खेळपट्ट्या स्पोर्टिंग असाव्यात हीच अपेक्षा आहे.
भारतीय संघाने नीचांकी धावसंख्या 36 नोंदवली व त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला. फलंदाजांनी चुका केल्या हे सत्य आहे पण खेळपट्टीचा रंग पहिल्याच दिवसापासून दिसू लागला हेदेखील नाकारता येणार नाही. कसोटीसाठी कशी खेळपट्टी असावी हे आता त्यांना कोण सांगणार.
प्रत्येक यजमान देश आपले गोलंदाजीतील सामर्थ्य ओळखूनच क्युरेटरला अनधिकृतरीत्या खेळपट्टी कशी असावी हे सांगतो. हे काही केवळ ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्येच घडते असे नाही तर भारतासह सगळ्याच देशांत घडते. भारतीय फलंदाजी आता विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणखी कमकुवत बनणऩार आहे. उरलेल्या तीन कसोटीत किमान पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा यांना बाहेरचा रस्ता दाखवत राहुल, ऋषभ पंत, शुभमन गील यांना संधी द्यावी.
तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठी रोहित शर्मा फिट झाला तर फलंदाजी जास्त सशक्त बनेल. नीचांकी धावसंख्येचा दिवस भारतीय क्रिकेटमध्ये जवळपास 51 वर्षांनी आला आहे. त्यावर लगेच गळे काढायची गरज नाही. या कसोटीत भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली हे मान्य पण अजून तीन कसोटी बाकी आहेत आणि भारतीय फलंदाज स्वतःची गुणवत्ता निश्चितच सिद्ध करतील, असा विश्वासही आहे.





