शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; कापूस बियाण्यांच्या दरात वाढ

नगर – कपाशीच्या दरात शासनाने वाढ केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. बियाण्यांच्या दरात 86 ते 246 रुपयांची वाढ झाली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बियाण्यांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे याबाबत तत्काळ संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग तिसऱ्या वर्षी कापसाच्या बियाणे दरांत वाढ केली आहे. यावर्षी प्रतिपाकीट (450 ग्राम) 43 रुपयांची वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना कपाशीच्या साध्या लागवडीसाठी एकरी 86 रुपये, तर चांगल्या दर्जाच्या लागवडीसाठी 246 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे. सध्या देशात उपलब्ध असलेले या बियाण्यांचे दर कमी असायला हवेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अलीकडे कापसाचे उत्पादन सातत्याने घटत आहे. त्यात अनेक कंपन्यांनी रॉयल्टीच्या नावावर शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेतले. तर आता केंद्र सरकार पैसे वसूल करीत आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेत्यांनी यांनी केला.





