व्यसन व वैवाहिक जोडीदाराचे नाते

व्यसन हा चोरपावलांनी शिरकाव करणारा मानसिक आजार आहे. याची सुरुवात झाल्यानंतर कधी ते व्यसनी व्यक्तीवर हावी होते हे त्या व्यक्तीला सुद्धा कळत नाही. प्रामुख्याने दारूचे सेवन सातत्याने होत राहिल्यास त्या व्यक्तीला दारूची ओढ लागते आणि ठराविक वेळेला ती घेतली नाही तर शरीराला त्रास व्हायला लागतो, याला वियोग लक्षणे असे म्हणतात. ही लक्षणे थोडी दारू घेतली की थांबतात. त्यामुळे सातत्याने दारूचे सेवन होत राहते.
व्यसनाचा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. व्यसनामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक दृष्ट्या खूप नुकसान होते. यामध्ये कोणते ना कोणते नुकसान हे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये होत असते पण त्याची कल्पना त्या व्यक्तीला येत नाही. व्यसनाचा सगळ्यात जास्त परिणाम हा त्याच्या कुटुंबातील लोकांना सहन करावा लागतो. यामध्ये पत्नी सर्वात जास्त भरडली जाते. सगळ्या पातळ्यांवर तिची कसोटी लागत असते. वरवर होणारा त्रास हा सर्वांना दिसतो पण पती-पत्नी या नात्यात काही न सांगण्यासारखा, समाजात उघडपणे न बोलता येणारा त्रास तिला सहन करावा लागतो.
तो म्हणजे लैंगिकतेतील त्रास.पंचेचाळीस वर्षाच्या राधाबाई. पतीला लग्नापासूनच दारूचे व्यसन होते. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चालू होतं. दोन मुलं झाली, हळूहळू पतीचे व्यसन वाढायला लागले. त्याचा कुटुंबावर परिणाम होऊ लागला. मुलं मोठी झाली, पती घरामध्ये पैसे द्यायचा पण रोज पिणं चालू होतं. तो राधाबाईवर संशय घेऊ लागला. तिला चारित्र्यावरून बोलू लागला. खरं तर राधाबाई खूप चांगल्या व सुसंस्कृत. पतीशिवाय त्या बाहेर कोणत्याही पुरुषाशी बोलणं सुद्धा टाळायच्या. पण पतीने असा संशय घेतल्यानंतर त्या स्वतःला दोष देऊ लागल्या. अपराधीपणा त्यांच्यामध्ये आला व त्यामुळे त्या खचल्या. तसं बघायला गेलं तर यामध्ये त्यांची काही चूक नव्हती. मुलं मोठे झाली होती. घरात दोनच खोल्या, यामध्ये पती शरीरसंबंध ठेवण्याचे मागणी करायचा पण त्या नाही म्हणायच्या. यामुळे तिचं कुठेतरी बाहेर अफेअर चालू आहे म्हणूनच पत्नी आपल्याला नाही म्हणते आहे असं पतीला वाटायचं.
व्यसनी व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध ठेवणे हे पत्नीला किळसवाणे वाटत असते. त्याच्या तोंडाला येणारी दुर्गंधी, आक्रस्ताळेपणा, एकांत न मिळणे, घर लहान असणे या कारणांमुळे पत्नी नकार देत असते. त्यामुळे बरेच वेळा व्यसनी व्यक्ती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असतो. काही केसेसमध्ये पत्नीला नमवण्यासाठी सुद्धा असे आरोप करून तिचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो.
व्यसनी व्यक्तीला लैंगिक समस्या खूप जास्त असतात. व्यसनामुळे लैंगिक कृतीत अडथळा येणे, तात्पुरते नपुंसकत्व येणे, याला पुरुष घाबरतात व वेगवेगळे प्रयोग करत राहतात. लैंगिक समस्यांनी त्रस्त झाल्यामुळे परत परत व्यसनाचा आधार ते घेतात आणि त्यामुळे समस्या अजून जास्त वाढतात. या सगळ्याचा परिणाम त्या स्त्रीच्या शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्यावर होतो. त्यामुळे महिलांनी व्यसनाच्या आजाराला समजून घेतले पाहिजे. असे आरोप पती करत असेल ज्यामध्ये काही तथ्य नाही तिथे ठामपणे आपली भूमिका मांडली पाहिजे. पतीचे होणारे वर्तन हे व्यसनामुळे होत आहे हे लक्षात ठेवले पाहिजे व यासाठी वेळीच उपचार घ्यायला हवेत. व्यसन थांबले तर हे सगळे प्रश्न सुटू शकतात.





