इर्शाळवाडीवर काळाचा घाला; नातेवाईकांचा हृदय पिळवटणारा आक्रोश

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. इर्शाळगडच्या पायथ्याला असलेल्या या वाडीत प्रामुख्याने आदिवासी समाजाची वस्ती आहे.
इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांचा अश्रूचा बांध फुटला आहे. यात काही लहान मुलेही बेपत्ता झाली आहेत. जिवाचा आकांत करुन लोक त्यांच्या नातेवाईकांना शोधत आहेत. रात्री झोपेत ही घटना घडल्याचे येथील लोक सांगत आहे. त्यामुळे लोकांची धावाधाव सुरू झाली. याबाबत एका वृत्तवाहिनीला एका महिलेने येथील घटनेचा संपूर्ण अनुभव सांगितला आहे. “रात्री आम्ही घरात बसलेलो होतो तेव्हा अचानक बाहेर जोरात आवाज झाला. आम्हाला वाटलं की एखादे घर कोसळलं आहे. बाहेर जाऊन बघितलं, तर संपूर्ण गावंच मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. आम्ही आरडाओरड करत होतो. मी माझ्या पतीला आणि दोन मुलांना ताबडतोब घेऊन गावाबाहेर पडले,” असा थरारक अनुभव महिलेने सांगितला.
अनेकांचे नातेवाईक या ढिगाऱ्याखाली अडकल्याने जनतेचा आक्रोश पाहायला मिळत आहे. दरम्यान, इर्शाळवाडीवर सहा किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. हा डोंगर चढत जात असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाला धाप लागली. त्यानंतर वाडीवरील दृश्य पाहून एका अग्निशमन दलाच्या जवानाला हृदयविकाराचा झटका आला. त्यात या जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.





