आपण फक्त “पारदर्शक कारभार’ असे शब्द राजकीय मंडळी किंवा प्रशासनात ऐकत असतो; पण पारदर्शक कारभार म्हणजे नेमके काय आणि तो नेमका असतो का, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात कायम आहे. मात्र, आम्ही म्हणू “होय, पारदर्शक कारभार’ असतो आणि त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करण्यासाठी सरपंच सोमनाथ कणसे यांचे नाव अग्रभागी येते. त्यांच्या याच पारदर्शक कारभाराची ही यशोगाथा. 7 जून 2021 – पवारवाडी (जवळार्जुन) येथे ग्रामस्थ प्रवीण पवार, लालासाहेब पवार, गणेश पवार यांच्या मागणी पत्राला साद देत नाझरे उत्तर-दक्षिण शिव शेती रस्ता सरपंच सोमनाथ कणसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला (मुरुमीकरण). गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात या रस्त्यावर पहिल्यांदा मुरुम पडला. ग्रामपंचायत जवळार्जुन अस्तित्वात आल्यापासून पवारवाडी 100 लोकवस्ती (जवळार्जुन पश्चिम टोक) या ठिकाणी कसलीच रस्ता विकास कामे झाली नसल्याचे कळत आहे. गुढघ्याएवढ्या चिखलातून मार्ग काढत जाणाऱ्या शेतकऱ्यर एक फोनवर दिलासा देत त्यांच्या गंभीर प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे काम सरपंच कणसे यांनी केले, ते वाखाणण्याजोगे आहे. 18 जून 2021 – आंबी शिव-एरंडी मळा-राणेवस्ती रस्ता खडीकरण करून पावसाळ्यात नागरिकांची होणारी मोठी गैरसोय सरपंच कणसे व गणेश राणे लोणारी समाज अध्यक्ष यांच्या सौजन्याने व माजी उपसरपंच शिवाजी राणे यांच्या सहकार्याने टाळली गेली. 15 मार्च 2021 – नाझरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जवळार्जुन गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेतील विद्युत पंपाचे वीकजोड महावितरण कंपनीने विजेचे कनेक्शन मागील वर्ष (एप्रिल 2019 पासून आजपर्यंत थकित रक्कम 2 लाख 45 हजार 140 रुपये) असलेल्या थकबाकीमुळे कट करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरपंच सोमनाथ कणसे यांनी महावितरण अधिकारी रॉय यांना विनवणी करून, लगेच ग्रामपंचायतमार्फत 1 लाख 22 हजार 600 रुपयांचा धनादेश देऊ केला आणि राहिलेले पैसे हे समान हप्त्यामध्ये करून घेतले, जे पुढील महिन्यापासून वीजबिलामध्ये ऍड करून येतील. त्यानंतर तोडलेले वीजजोड महावितरण कंपनीने पूर्ववत करून दिले आहे. यामुळे जवळार्जुन गावाचा संभाव्य विस्कळीत पाणीपुरवठ्याचा धोका टाळला गेला आहे. – विकासकामे जलजीवन मिशन अंतर्गत जवळार्जुन गाव व सर्व वाडी-वस्तीवरील नागरिकांसाठी नाझरे धरणावरून घरपोच पाणीपुरवठा योजना- 1 कोटी 96 लाख रुपयांचे काम प्रगतीपथावर आहे आमदार फंडातून चोरवाडी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण- 10 लाख रुपये जिल्हा परिषद फंडातून राणेवस्तीमधील अंतर्गत 2 रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण-20 लाख रुपये 14 वा वित्त आयोगातून गावठाणामध्ये अंकुश टेकवडे ते विठ्ठल मंदिर अंतर्गत रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण- 4 लाख रुपये ग्रामपंचायत इमारतीवरील पहिल्या मजल्यावरील हॉलचे बांधकाम- 4 लाख रुपये जिल्हा परिषद निधी-राणेवस्तीवरील प्राथमिक शाळा दुरुस्ती- 3 लाख रुपये चोरवाडी याठिकाणी अंगणवाडी शाळेसाठी बोरवेल व मोटर बसविणे जिल्हा परिषद पुणे, राणेवस्ती जिल्हा परिषद शाळा संरक्षित भिंत कामाचं भूमिपूजन- 3 लाख रुपये आमदार फंडातून चोरवाडी याठिकाणी हायमास्ट दिवे बसविणे- 2 लाख रुपये – प्रस्तावित मंजुरीस असणारी कामे कऱ्हा नदीवरील 6 बंधारे दुरुस्ती प्रस्तावित आहे -प्रत्येकी 45 ते 50 लाख रुपये खर्च अपेक्षित. जवळार्जुन गावठाण, वारजाई मळा, विठ्ठलवाडी, गोंधळे नगर, राणे वस्ती, एरंडी मळा, पवार वस्ती, चोरवाडी, सांजोबाचा मळा या सर्व ठिकाणी अंतर्गत गटार लाइन व रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे. जवळार्जुन गाव व सर्व वाडीवस्तीवरील महत्त्वाचे चौक आणि जेजुरी-मोरगाव मुख्य रस्त्यावर सोलर दिवे बसविणे. गावाच्या हद्दीमध्ये पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी थेट नाझरे धरणाच्या कालव्यावरील चिमणी क्रमांक 9 पर्यंत बंद पाइपलाइनद्वारे पाणी सोडण्याबाबत मागणी करणारे निवेदन वेळोवेळी संबंधित मंत्री व प्रशासकीय अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवली आहेत. जवळार्जुन नाझरे शिव ते आंबी शिव रस्त्याच्या कामासंदर्भात विविध स्तरांवर मागणीचे निवेदन वेळोवेळी दिलेली आहेत. सर्व वाड्यावस्त्यांवर स्मशानभूमीसाठी प्रशासनाकडे मागणी केली असून त्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आठ गुंठे जागाही उपलब्ध करून दिली आहे. मंजूर कामे; मात्र प्रतीक्षेत जिल्हा परिषद निधी – चोरवाडी प्राथमिक शाळा दुरुस्ती – 3 लाख 50 हजार रुपये जिल्हा नियोजन निधी – राणेवस्ती अंतर्गत रस्ता करणे – 3 लाख रुपये जिल्हा परिषद निधी – गावातील स्मशानभूमी दुरुस्ती व सुधारणा – 3 लाख रुपये …अन् संधीचे सोने केले 2008 मध्ये ज्या ट्रान्स्पोर्ट ऑफिसमध्ये ते स्वतःची गाडी भरण्यासाठी जात होते त्याच ट्रान्स्पोर्ट चालकाने त्यांच्यातील हुशारी, अनुभव पाहून त्यांना त्याठिकाणी ऑफिसमध्ये काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करत त्यांनी त्या ट्रान्स्पोर्ट ऑफिसचे नाव अग्रगण्य यादीत आणले; परंतु प्रामाणिकपणे काम करत असताना पुढे ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाच्या कौटुंबिक वादामुळे त्यांना त्या ठिकाणाहून 2018 मध्ये बाहेर पडावे लागले व त्यानंतर संघर्ष करत आपले स्वतःचे ट्रान्स्पोर्ट ऑफिस 2019 मध्ये सुरू केले. वॉटर फिल्टरमधून सरासरी 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न जवळार्जुन गावातील गावठाण, राणेवस्ती आणि चोरवाडी याठिकाणी आदर्श संसदग्राम अंतर्गत सर्व लोकांना पिण्यासाठी पाणी फिल्टर योजना चालू आहे, ज्या योजनेवर 2021 पर्यंत वार्षिक साधारणतः 3 ते 4 लाख रुपये खर्च दाखवून जनतेच्या पैशांचाही उधळपट्टी सुरू होती व ते प्रकल्प तोट्यामध्ये सुरू होते. अशा वेळेस सरपंच म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर, योजनेचा सर्व बारकाईने अभ्यास करून, जास्तीचा पैसे उकळण्यासाठी सुरू असलेला खर्च बंद केला व आता फिल्टरचे वार्षिक उत्पन्न सरासरी 2 ते 3 लाख रुपये होत आहे आणि खर्च फक्त 1 लाख रुपयांच्या आसपास होत आहे. कोविडमध्ये जीवाची पर्वा न करता… मागील काही वर्षांपासून सोमनाथ कणसे यांनी केलेल्या गावातील सामाजिक कामामुळे एक चांगले जनमत तयार होत गेले. मार्च 2020 मध्ये कोविडसारखी महाभयंकर साथीची लाट आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता, गावामधील कोविड लागण झालेल्यांना दवाखान्यामध्ये ने-आण करणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे यासारखी माणुसकीची कामे न घाबरता केली. संकलन : अमोल बनकर, पुरंदर तालुका प्रतिनिधी