भोर तालुका तसा निसर्गसंपन्न असला तरी येथील वाड्या-वस्त्यांचा विकास करताना येथील निसर्गसमृद्धीला धोका न पोहोचता त्यांचा विकास करण्याचे सूत्र येथील सर्वच ग्रामपंचायती करताना दिसून येत आहेत. गवडी ही भोर तालुक्यातील अशीच एक ग्रामपंचायत. गवडी गावाची लोकसंख्या 1450 असून, काशिनाथ पर्वती साळुंके हे 2021 पासून सरपंचपदावरून या गावाचा कारभार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करीत आहेत. काशिनाथ साळुंके एक तरुण उमदे नेतृत्व आहे. गावाचा आणि गावातील वाड्या-वस्त्यांच्या विकास हा त्यांचा ध्यास आहे. यातूनच त्यांनी सव्वातीन कोटींची विकासकामे केली आहेत. सामाजिक बांधीलकीतून आणि माणसे जोडण्याच्या त्यांच्या स्वभावातून त्यांना त्यांचे गाव विकासाचे कार्य करणे सोपे झाले आहे. जनसंपर्क चांगला असल्याने आणि गावात होणारी कामे यशस्वी होत असल्याने सरपंचपदाच्या निवडीत कोणतीही अडचण त्यांना आली नाही आणि त्यांच्या माध्यमातून गवडी गावाला एक समृद्ध तरुण नेतृत्व मिळाले आहे. गवडी गाव डोंगराच्या पायथ्याशी असल्याने येथील रस्ते पावसाळ्यात विशेषतः चिखलमय होत असत आणि हे त्यांनी अगदी लहानपणापासून अनुभवले होते. त्यातूनच गावातील रस्ते चांगले करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. सरपंचपदावर आल्यानंतर त्यांनी या कामाला आधी सुरुवात केली. गावातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे आणि त्यामुळे गावाला होणारा फायदा येथील नागरिकांना समजावून देण्यात ते यशस्वी झाले. आता गावातील जवळजवळ 80 टक्क्यांचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. गावातील वाड्या-वस्त्यांवरील रस्ते घराघरांपर्यंत चांगले झाले असल्याने पावसाळ्यात होणारा चिखलमय रस्त्यांचा त्रास कमी झाला. पर्यायाने या काळात दलदल, पाणी, चिखल यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर होणारा परिणामही कमी झाला असल्याने चांगल्या आरोग्याचे महत्त्वही येथील लोकांना पटले आहे. या भागात रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय होती की, भाद्रपदात गणपती बसले तर महिला एकमेकींकडे चिखलमय रस्त्यांमुळे साधे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला जाऊ शकत नव्हत्या. रस्ते चांगले असेल तर गावाचा विकास लवकर आणि चांगल्या पद्धतीने होतो, यावर त्यांचा विश्वास असल्याने त्यांनी गावात आधी रस्त्यांचे काम पूर्ण करण्यावर भर दिलेला आहे. पाणंद रस्ते, शेतात जाण्यासाठी करावयाचे रस्ते यासाठी शेतकऱ्यांबरोबर बैठका घेतल्या. त्यांच्या हद्दीतून जाणारा रस्ता त्यांच्याच फायद्यासाठी कसा आहे, हे समजून सांगितले. रस्ते असतील तर शेती उत्पादनाची वाहतूक बाजारपेठेपर्यंत करणे सोयीस्कर होणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात यामुळे भर पडणार आहे, हे शेतकऱ्यांना सिद्ध करून दाखवल्यावर पाणंद रस्तेही करण्यासाठी फारशी अडचण आली नाही. मारुती मंदिराचा जीर्णोद्धार आणि सभामंडप तयार करण्यात आला आहे. रस्त्याबरोबरच मुख्य अडचण येथे होती ती एसटी बसस्टॅंडची. मोडकळीस आलेले बसस्टॅंडची स्थिती भीतिदायक होती. पावसाळ्यात कधीही ते कोसळेल या भीतीने नागरिक स्टॅंडवरील शेडमध्ये थांबतच नव्हते. मात्र, आता विकासनिधीतून गावाजवळ रस्त्याच्या कडेला सिमेंटकॉंक्रिटचे साडेचार लाखांचे बसस्टॅंड शेड बांधण्यात आले आहे, त्यामुळे उन्हा-पावसात प्रवाशांना बससाठी थांबावे लागत नाही. काशिनाथ साळुंके रस्त्याच्या कामाबरोबरच पाण्याच्या प्रश्नाबाबत देखील गांभीर्याने विचार करून त्याबाबत सक्रिय योजना करीत आहेत. गवडी गावात पाण्याची एकच विहीर होती. तिचे पाणी जानेवारीपर्यंत जेमतेम पुरायचे आणि नंतर फेब्रुवारीत एक दिवस आड पाणी पुरवावे लागायचे आणि त्यानंतर पाणी टंचाईचा जटिल प्रश्न निर्माण होत होता. 15 मिनिटे कसेबसे पाणी गावाला मिळत होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत एक कोटीची योजना गावासाठी हाती घेण्यात आली. नीरा नदीचे पाणी विहिरीत आणून ते डोंगरमाथ्यावर नेण्यात आले आणि तिथून टाकीतून गावाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. आता गावात 24 तास पाणी आहे आणि हे काम देखील 80 टक्के पूर्ण होत आले आहे. यापुढे पाण्यासाठी गावात मीटर बसवण्यात येणार आहेत. पाण्याच्या टाकीसाठी जागा बक्षीसपत्राने घेण्यात आली आहे. सुमारे साडेनऊ लाखांचा फिल्टर प्लॅण्ट येथे बसवण्यात आला आहे. पाण्याची लाइन बंदिस्त असल्याने घरोघरी शुद्ध पाणी मिळत आहे आणि साडेतेरा लाखांचा सोलर प्लॅण्ट आहे. गवडी गाव 100 टक्के हागणदारीमुक्त आहे. आरोग्यासाठी नेत्र, सर्वरोग निदान, महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी आदी शिबिरांच्या माध्यमातून ग्रामस्थांना आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. करोना काळातही सरकारने सांगितलेल्या आरोग्याबाबतच्या सर्व प्रकारची काळजी घेऊन काम केले असल्याने गावात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. गवडी गावात स्मशानभूमीची समस्या मोठी होती. पावसाळ्यात चिखलातून दहनविधीसाठी जाताना ग्रामस्थांचे हाल होत होते. गुडघाभर चिखलातून मृतदेह नेताना नागरिकांना त्रास होत होता. त्यामुळे काशिनाथ साळुंखे यांनी स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला. आता गावाजवळच रस्त्याच्या अगदी कडेला 6 लाख रुपये खर्च करून आरसीसीमध्ये सर्वसोयींनी युक्त अशी स्मशानभूमी बांधण्यात आली आहे आणि याच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे गेला असून, लवकरच ते कामही हाती घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या सहकार्यांतून समाजाभिमुख कामात सरपंच काशिनाथ साळुंके यांना यश येत आहे. गवडी गाव हे बाजीप्रभू देशपांडे यांच्या शिंद गावापासून जवळ आहे, त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही गावाचा विकास करण्याचा काशिनाथ साळुंखे यांचा मानस असून, त्या दृष्टीनेही त्यांचे नियोजन सुरू झाले आहे. गवडी गावाचे ग्रामदैवत जानुबाई आहे. यात्रा-उत्सव काळात आणि इतरवेळीही या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळी मंदिरासाठी सभागृहाची गरज भासत होती. मंदिर पत्र्याच्या शेडमध्ये होते. मात्र आता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून, सुसज्ज असा सभामंडप बांधण्यात आला आहे. यासाठी सुमारे 60 लाखांचा निधी वापरण्यात आला आहे. ग्रामपंचायत इमारतीचे कामही प्रगतीपथावर आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच काशिनाथ साळुंके यांना सखाराम साळुंके, संपत साळुंके, सुनील साळुंके, अरविंद सुर्वे, जयवंत जाधव, आशोक धोंडे, शाम कुमकर, संदीप पडवळ, उत्तम साळुंके, संपत ना. साळुंके, अंकुश साळुंके, वासुदेव साळुंके, कुमार साळुंके, पापाजी साळुंके यांचे सहाकार्य लाभत आहे. शाळेची चांगली सोय प्राथमिक शाळेची अवस्थादेखील दयनीय होती. मात्र, गेल्या दीड वर्षांत शाळेत वर्गखोल्या बांधल्या असून, आता येथे विद्यार्थ्यांना शाळेची चांगली सोय झाली आहे. याबरोबरच अंगणवाडीचे कामही झाले असून, अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत तयार झाली आहे. शाळेसाठी आणि अंगणवाडीसाठी शुद्ध पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे आणि नळपाणी योजनाही राबवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची पाण्यासाठी वणवण थांबली आहे. शाळेसाठी कॉम्प्युटर सेटही देण्यात आले आहेत. याबरोबरच खेळाचे ग्राऊंड, व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. कुस्ती महाराष्ट्राचा प्रमुख खेळ आहे आणि त्यासाठी गावोगावी सुसज्ज आखाडे असावेत आणि या खेळाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने लवकरच कुस्तीसाठी विशेष आखाडा तयार करण्यात येणार असल्याचे सरपंच साळुंखे यांनी सांगितले. यात्रा-जत्रांत कुस्तीचे आखाडे मोठ्या प्रमाणात भरवले जातात, त्यासाठी या गोष्टी गावात असणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे. “या’ गोष्टी ठरल्या महत्त्वाच्या गावात 11 बचत गटांचे महिलांचा ग्रामसंघ आहे. या माध्यमातून सुमारे 110 महिलांना रोजगार निर्माण झाला आहे. गावात 80 टक्के महिला स्वयंपूर्णतेने काम करीत आहेत. काशिनाथ साळुंखे यांच्या घरात तशी राजकीय पार्श्वभूमी नाही; पण समाजकार्याच्या आवडीतून राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. या त्यांच्या कार्यात त्यांच्या कुटुंबाचाही मोठा सहभाग आहे. त्यांच्या पत्नी बचत गटाच्या माध्यमातून गावातील महिलांशी संवाद साधून आहेत. निधीचा योग्य वापर, विकासाची गती, यात येणाऱ्या अडथळ्यांवर देखील समाजमन ओळखून त्यांचे प्रबोधन करून अनेक समस्यांवर तोडगा काढण्यात त्यांना मिळालेले यश या सगळ्याच गोष्टी त्यांच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. संकलन : भुजंगराव दाभाडे