नवी दिल्ली – डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत अदानी विल्मर या कंपनीचा नफा दुपटीने वाढून 411 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहित या कंपनीला केवळ 200 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत कंपनीचा महसूल वाढून 16,926 कोटी रुपये झाला आहे. जो की गेल्या वर्षी यातील तिमाहीत 12,887 कोटी रुपये इतका होता. तेल आणि इतर ग्राहक उपयोगी वस्तूंच्या विक्रीत वाढ होत आहे. त्यामुळे महसूल वाढण्यास मदत झाली असल्याचे अदानी विल्मर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंगशू मलिक यांनी सांगितले. आमच्या सर्वच उत्पादनांना चांगली मागणी आहे. त्यामुळे गेल्या चार तिमाहीपासून कंपनीच्या नफ्यात वाढ होत आहे. आगामी काळातही कंपनी नफादायक वाटचाल करत राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. देशातील सर्वच भूभागातून आमच्या खाद्य तेलाला चांगली मागणी आहे. त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचा व्यवसाय इतर कंपन्यांपेक्षा जास्त झाला आहे. मार्च 2022 मध्ये आमचा 5,000 तालुका पातळीवर प्रभाव होता. मात्र आता आम्ही 43 हजार तालुक्यांमध्ये आमचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर ई-कॉमर्सच्या माध्यमातून आमची विक्री 41 टक्क्यांनी वाढली आहे. दक्षिणेकडील राज्यात आमचे काम वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. या ताळेबंदानंतर कंपनीच्या शेअर चा भाव 5 टक्क्याने वाढून 244 रुपये 60 पैसे प्रति शेअर या पातळीवर गेला होता.