नवी दिल्ली – भांडवल सुलभता आणि वाढलेला आत्मविश्वास या आधारावर अदानी समूहाने कंपनी अधिग्रहणाची मोहीम तीव्र केली आहे. 2023 पासून या समूहाने 80 हजार कोटी रुपये म्हणजे 9.6 अब्ज डॉलर मोजून 33 कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. मध्यंतरी या कंपनीवर गैरप्रकाराचा आरोप अमेरिकेतून झाल्यावर अल्प काळ या मोहिमेवर परिणाम झाला होता. मात्र आता हा समूह अधिक जोमाने विस्तारीकरणाची मोहीम हाती घेत असून छोट्या-मोठ्या कंपन्यांचे अधिग्रहन करीत असल्याचे दिसून येत आहे. अदानी समूह पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत आहे. या क्षेत्राला संलग्न अशा इतर कंपन्या खरेदी करण्यावर या समूहाने भर दिला आहे. प्राप्त माहितीनसार या समूहाने बंदरासंबंधातील 28,145 कोटी रुपयांच्या, सिमेंट संदर्भातील 24,710 कोटी रुपयांच्या, वीज निर्मिती संदर्भातील 12,201 कोटी रुपयांच्या कंपन्या या काळात खरेदी केल्या. याशिवाय वीज वहन क्षेत्रातही या समूहाची आगेकूच चालू आहे. या यादीत हा समूह लवकरच खरेदी करणार असलेल्या जे पी समूहाचा समावेश नाही.13,5000 कोटी रुपयाचा हा समूह लवकरच अदानी समूहाच्या आखत्यारीत येणार आहे. या समूहावर गैरव्यवहाराचे आरोप अमेरिकेत 2023 मध्ये झाले. हे सर्व आरोप या समूहाने वेळोवेळी नाकारले आहेत आणि यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. मात्र समांतररित्या या समूहाने विविध क्षेत्रात आपले काम वाढविले आहे. त्याचबरोबर विविध कंपन्यांचे ताळेबंद मजबूत करून कर्जाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. दरम्यानच्या काळामध्ये या समूहाने कंपन्यांची कार्यक्षमता वाढविली आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या नफ्याचे कर्जाशी प्रमाण कमी पातळीवर ठेवण्यात आले आहे. या काळात अदानी समूहाने ऑस्ट्रेलियातील बंदर विकत घेतले आहे. या समूहातील अंबुजा सिमेंट कंपनीने सांघी इंडस्ट्रीजमधील भाग भांडवल घेतले आहे. या समूहातील एसएससी कंपनीने एशियन काँक्रीट्स अँड सिमेंट कंपनीचे अधिग्रहण केले. कंपनी पुढील पाच वर्षात दहा लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आहे. यामध्ये बरीच रक्कम अधिग्रहणासाठी वापरली जाऊ शकेल.