नवी दिल्ली : अदानी समूहातील बर्याच कंपन्यांच्या शेअरच्या भावात मंगळवारी घट नोंदली गेली. अदानी पोर्ट्स, एनडीटीव्ही, अदानी एनर्जी या कंपन्यांच्या शेअरचा भाव दोन टक्क्यापर्यंत कमी झाला होता. अदानी समूहाने सोमवारी अदानी समूहातील कोणतीही कंपनी इराणमधून किंवा इराणमधील कुठल्याही जहाजाच्या माध्यमातून आपल्या कोणत्याही बंदरावर कसलेही काम करत नाही असे स्पष्ट केले होते. इराणवर घातलेल्या बंदीचा भंग कंपनीने केलेला नाही असेही स्पष्टीकरण या समूहाने केले होते. अदानी समूहातील कोणत्याही कंपनीचा इराण मधील एलपीजी वायू संदर्भात संबंध जोडणे आधारहीन आणि खोडसाळपणाचे असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने केले होते. तशी माहिती भारतीय शेअर बाजारांना कळविली होती. काही दिवसापूर्वी अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नल या नियतकालिकाने अदानी समूहातील कंपन्यांनी इराणचा एलपीजी वायू गुजरातमधील मुद्रा बंदराच्या माध्यमातून आयात केल्याची बातमी दिली होती. तसेच यासंदर्भात अमेरिकेत चौकशी चालू असल्याचेही या वृत्तांत म्हटले होते. त्यानंतर लगेच अदानी समूहाने या वृत्ताचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. या घडामोडीचा अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरवर झाला असल्याचे दिसून येते. समूहाने शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले आहे की, धोरण म्हणून अदानी समूह इराणशी संबंधित कुठल्याही बाबीची आमच्या बंदरावर हाताळणी करत नाही. इराणमधून किंवा इराणी कंपन्यामधून आलेल्या किंवा इराणचा ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजाशी आमचा कसलाही व्यवहार होत नाही.तसेच अदानी समूहातील कोणत्याही बंदराच्या माध्यमातून इराणच्या कुठल्याही जहाजाशी कसलाही व्यवहार होणार नाही याची काळजी घेतली जाते असे अदानी समूहाने स्पष्ट केले आहे. निर्बंर्धाचा भंग नाही इराणच्या संशयित अणु कार्यक्रमामुळे इराणवर अमेरिकेने बरेच निर्बंध घातले आहेत. अदानी समूहाने सांगितले की या निर्बंधाचा भंग करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर अमेरिकेत यासंदर्भात चौकशी होत असल्याचे आम्हाला माहीत नाही. वॉल स्ट्रिट जर्नलमधील वृत्त आधारहीन आहे. ते केवळ चुकीच्या माहितीवर किंवा अंदाजावर आधारित असल्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले.