अदानी समूहाचे शेअर कोसळले 22 टक्क्यांनी; एकाच दिवसात कंपनीचे 2.19 लाख कोटी रुपयांचे नुकसान

मुंबई, – अदानी समुहातील कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 265 दशलक्ष डॉलर म्हणजे 2,200 कोटी रुपयांची लाच भारतीय अधिकार्यांना दिल्याचा आरोप अमेरिकेत करण्यात आला. यामध्ये अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांचे हे नाव आहे. या कारणामुळे अदानी उद्योग समूहातील कंपन्यांच्या शेअरचे भाव 22 टक्क्यापर्यंत कोसळले. परिणामी या समूहाचे एकाच दिवसात 2.19 लाख कोटी रुपयांच नुकसान झाले.
अमेरिकेतील हिंडेनवर्ग समूहाने अदानी उद्योग समूह शेअरच्या किमती फुगविण्यासाठी गैरप्रकार करत असल्याचा आरोप 2023 मध्ये केला होता. त्यानंतर अदानी समूहाचे जेवढे नुकसान झाले होते त्यापेक्षा दुप्पट नुकसान आज एकाच दिवसात या समूहाचे झाले.
अदानी समूहातील मुख्य कंपनी असलेल्या अदानी एंटरप्राईजेस या कंपनीचा शेअर 22.61 टक्क्यांनी, अदानी एनर्जी सोल्युशन या कंपनीचा शेअर 20 टक्क्यांनी, अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीचा शेअर 19 टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स कंपनीचा शेअर 13.53 टक्क्यांनी, अंबुजा सिमेंट कंपनीचा शेअर 11.98 टक्क्यानी, अदानी टोटल गॅस कंपनीचा शेअर 10.40 टक्क्यांनी कोसळला. या समूहातील अदानी विल्मर कंपनीचा शेअर दहा टक्क्याने, अदानी पावर कंपनीचा शेअर 9.15 टक्क्याने, एसीसी कंपनीचा शेअर 7.19 टक्क्याने, एनडीटीव्ही कंपनीचा शेअर 0.06 टक्क्याने कोसळला.
या या समूहातील बर्याच कंपन्यांना आज लोअर सर्किट लावावे लागले. यामुळे या समूहातील कंपन्यांचे बाजार मूल्य एकाच दिवसात 2.19 एक लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
शेअर बाजारात नकारात्मक वातावरण असतानाच अदानी समूहावर गंभीर आरोप झाल्यामुळे शेअर निर्देशांकावर आणखी दबाव आला असे मेहता इक्विटी या संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी सांगितले.
अमेरिकेतील कायदा विभागातील अधिकार्यांनी केलेल्या आरोपांनुसार गौतम अदानी यांच्यासह त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि इतर सहा जणांनी आंध्र प्रदेश आणि ओरिसातील अनामिक राज्य सरकार कर्मचार्यांना महाग सौरऊर्जा पुरविण्याचे कंत्राट घेण्यासाठी भ्रष्टाचार केला. यामुळे पुढील वीस वर्षात या समूहाला दोन अब्ज डॉलरचा फायदा होणार होता. हा आरोप अमेरिकेतील कायदा विभाग आणि शेअर बाजार नियंत्रकानी केला आहे.





