नवी दिल्ली – जून मध्ये संपलेल्या बारा महिन्यात अदानी समूहाचा ढोबळ नफा म्हणजे करपूर्व नफा वाढून 90 हजार 572 कोटी रुपयावर गेला असल्याची माहिती या समूहाने जारी केली आहे. पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा आणि विमानतळ उद्योगातून उलाढाल वाढल्यामुळे हा नफा वाढला असल्याचे समूहाने नमूद केले. गेल्या वर्षी जून अखेर संपलेल्या महिन्यात या समूहाचा नफा 85,502 कोटी रुपये इतका होता. त्यामध्ये आता बरीच वाढ झाली असल्याचे या समूहाने नमूद केले. एप्रिल ते जून या तिमाहीत या समूहाचा ढोबळ नफा विक्रमी म्हणजे 23,793 कोटी रुपये इतका होता. या तिमाहीत कंपनीच्या पायाभूत सुविधा वाहतूक क्षेत्रात उलाढाल वाढली होती. या क्षेत्राचा एकूण ढोबळ नफ्यात 87% इतका वाटा होता. या समूहाने विमानतळ, सौरऊर्जा आणि पवन ऊर्जा या क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली असून सरलेल्या तिमाहितील नफ्यात या क्षेत्राचा वाटा दहा हजार कोटी रुपयाचा होता. त्यामुळे कोळसा क्षेत्रातील कमी झालेल्या नफ्याचा एकूण समूहाच्या नफ्यावर जास्त परिणाम झाला नाही. या वाढलेल्या नफ्याबद्दल समाधान व्यक्त करून या समूहाने सांगितले की, विमानतळ, हरित ऊर्जा, बंदर, एसईझेड आणि सिमेंट क्षेत्रातील उलाढाल आणि नफाही वाढत आहे. या नफ्यामुळे अदानी समूहाला खेळते भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. आश परिस्थितीत वार्षिक पातळीवर 1.5 लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता सिद्ध होत आहे. अदानीकडील रोख गंगाजळी सध्या 53,843 कोटी रुपयावर आहे. एकूण कर्जाच्या ही रक्कम 19 टक्के इतके आहे. अशा परिस्थितीत समूहाला कर्जाचे हप्ते पुढील 21 महिने देण्यात कसलीही अडचण येणार नाही.