Adani Group : अदानी आंध्र प्रदेशात करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक

विशाखापट्टणम : एन चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेशाचे सरकार उद्योगासाठी पूरक वातावरण निर्माण करीत आहे. अशा परिस्थितीत मोठी किनारपट्टी लाभलेल्या आंध्र प्रदेशात अदानी समूह पुढील दशकात एक लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार असल्याचे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांचे ज्येष्ठ चिरंजीव करण अदानी यांनी सांगितले.
उद्योग विषयक परिषदेत बोलताना अदानी यांनी सांगितले की, ही गुंतवणूक आंध्र प्रदेशातील बंदर विकास, सिमेंट निर्मिती, डेटा सेंटर, ऊर्जा आणि आधुनिक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात केली जाणार आहे. अगोदरच अदानी समूहाने 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आंध्र प्रदेशांमध्ये केली आहे. नवी गुंतवणूक त्यापेक्षा वेगळी असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अदानी यांनी यावेळी विशाखापट्टणम येथे 15 अब्ज डॉलरचा टेक पार्क उभारला जाणार असल्याचे सांगितले. या पार्कमध्ये गुगल एक गिगा वॅटचे डेटा सेंटर उभारणार आहे. त्याचबरोबर इतर अनेक कंपन्या या पार्कमध्ये आपले विशाल उद्योग निर्माण करणार आहेत. अदानी समुहाने आंध्र प्रदेशात अगोदरच प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या एक लाख रोजगार निर्माण केले आहेत. आगामी काळातही रोजगार निर्मितीची प्रक्रिया चालू राहणार आहे.





