नवी दिल्ली : अदानी समूहाने अडचणीत असलेल्या जयप्रकाश असोसिएट्सला खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या समूहाला कर्ज दिलेल्या संस्थांनी आदानी समूहाला ही कंपनी खरेदी करण्यास काही हरकत नाही असे सांगितले आहे. ही प्रक्रिया बोलीच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहे. अदानी समूहासह दालमिया सिमेंट, वेदांत समूहाने जयप्रकाश असोसिएटसाठी बोली बोलली होती. कर्ज देणार्या संस्थांची 89% मते अदानी समूहाला मिळाली आहेत. राष्ट्रीय मालमत्ता फेररचना कंपनीकडे यासंदर्भातील 86% मते आहेत. तर स्टेट बँक व आयसीआयसीआय बँकेकडे तीन टक्के मते आहेत. अदानी समूहाने सुरुवातीला सर्वात जास्त म्हणजे 6,500 कोटी रुपये देण्याचे ठरविले होते. तर उरलेले 6,726 कोटी दोन वर्षांनंतर देण्याचे ठरविले होते. इतर बोलीदारांची रक्कम कमी होती. त्यामुळे अदानी समूहाने ही कंपनी खरेदी केल्यास योग्य राहील असे सांगण्यात आले. जयप्रकाश असोसिएट्स या कंपनीवर 57,185 कोटी रुपयांचे कर्ज असून गेल्या वर्षी जून महिन्यात या कर्जाचा हप्ता देण्यास या कंपनीला अपयश आले. ही कंपनी रिअल इस्टेट, सिमेंट, आदरातिथ्य, ऊर्जा, अभियांत्रिकी, बांधकाम इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला इतर 25 कंपन्यांनी अधिग्रहण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र छाननीनंतर फक्त तीन कंपन्या कायम राहिल्या. त्यातून अदानी समूह सध्या ही कंपनी खरेदी करण्यासाठी आघाडीवर असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जर अदानी समूहाने जयप्रकाश असोसिएट अधिग्रहण केले तर या समूहाचा उत्तर भारतातील प्रभाव वाढणार आहे. जयप्रकाश असोसिएट्सचे दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात बरेच प्रकल्प आहेत.