“मकडी’ चित्रपटातील दुहेरी भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली प्रसिद्ध बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्वेता बासू प्रसादपे पतीपासून विभक्त होत आहे. लग्नानंतर अवघ्या वर्षभराच्या आतच श्वेताने घटस्फोट घेत असल्याची घोषणा सोशल मीडियावरुन केली. श्वेताने गतवर्षी डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेण्ड रोहित मित्तलसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र पहिल्या ऍनिव्हर्सरीआधीच दोघांनीही परस्पर सहमतीने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला.
रोहित मित्तल आणि मी परस्पर सामंजस्याने आपापले मार्ग वेगळे करण्याचा आणि विवाहबंधन तोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दिवस विचार-विनिमय केल्यानंतर आम्ही एकमेकांच्या हितासाठी काही महिन्यांपूर्वी या निर्णयापर्यंत पोहचलो. काही गोष्टींची मजा अपूर्णत्वातच असते. मला अविस्मरणीय आठवणी आणि नेहमीच प्रेरणा दिल्याबद्दल रोहितचे आभार. उज्ज्वल आयुष्य जग, मी नेहमीच तुला प्रोत्साहन देत राहीन, अशी पोस्ट श्वेताने केली आहे.
श्वेता विवेक अग्निहोत्रीच्या “द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटात नुकतीच दिसली होती. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या “मकडी’ चित्रपटातून तिने बाल कलाकार म्हणून सिने इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. त्यानंतर ती “कहानी घर घर की’ आणि “करिश्मा का करिश्मा’ या टीव्ही शोमध्ये झळकली होती. याशिवाय श्रेयस तळपदेसोबत “इक्बाल’ चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती.