‘ठग लाइफ’मध्ये अभिनेत्री सान्या मल्होत्राचा कॅमिओ

Thug Life Movie : मणिरत्नम आणि कमल हासन यांची दिग्दर्शक अभिनेत्याची जोडी पुन्हा एकदा ठग लाईफ चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडदा गाजवण्यासाठी येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ठग लाईफ या बहुप्रतिक्षेत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात कलम हसनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटात एका बॅालीवूड अभिनेत्रीची एन्ट्री होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात येत असून नुकतीच मणिरत्नम यांनी तमिळ मासिक विकटनला दिलेल्या मुलाखतीत बॅालीवूड अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा केला आहे. या चित्रपटात बॅालीवूड इंस्ट्रीतील अभिनेत्री सान्या मल्होत्रा पाहायला मिळणार आहे. ठग लाईफमध्ये एका खास कॅमिओत सान्या दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मणिरत्नम म्हणाले, “सान्याची भूमिका चित्रपटात छोटी असून ती फक्त एकाच गाण्यात दिसणार आहे.
ती एक उत्तम नृत्यांगना आहे आणि खूप चांगली व्यक्ती असल्याचे म्हणत तिचे कौतुकही त्यांनी केले. या चित्रपटाची कथा दिल्लीमध्ये घडत असल्याने कथेची प्रादेशिक सत्यता टिकवून ठेवण्यासाठी सान्याला तिच्या उत्तर भारतीय लूक आणि स्टाइलसाठी निवडण्यात आल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक मणीरत्नम यांनी स्पष्ट केले आहे. या चित्रपटाला ए.आर. रहमान यांचे संगीत लाभले आहे .
ठग लाइफमध्ये कमल हासन रंगराया शक्तीवेल नायकर या गुंडाच्या भूमिकेत आहेत. सिलांबरसन, त्रिशा कृष्णन, ऐश्वर्या लक्ष्मी, अशोक सेल्वन, जोजू जॉर्ज, नस्सर, अली फजल आणि रोहित सराफ या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ५ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे आणि चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.





