Actress Rupali Bhosale | अभिनेत्री रुपाली भोसलेने ‘बिग बॉस’ व त्यानंतर ‘आई कुठे काय करते’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘संजना’ या पात्राच्या माध्यमातून रुपाली महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही रुपाली सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.
अभिनेत्रीद्वारे तिच्या कामाबद्दल व वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केल्या जातात. काही दिवसांपूर्वीच तिने नवीन गाडीही खरेदी केली होती. आता रुपालीने तिच्या आईच्या नवीन प्रवासाबद्दल माहिती दिली आहे.
रुपालीच्या आईने नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे. तिने याबाबत सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या आईने घरगुती जेवणाच्या ऑर्डर घेण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. भविष्यात क्लाउड किचन किंवा रेस्टॉरंट सुरू करण्याचाही त्यांचा विचार आहे.
View this post on Instagram
आईच्या नवीन व्यवसायाबाबत माहिती देताना रुपाली म्हणाली की, ‘हाय-हॅलो नमस्कार, आजचा बेत आहे काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळ्या. आमच्या कोकणात काळ्या वाटाण्याच्या उसळीला एक वेगळंच महत्त्व, वेगळं स्थान आहे. प्रत्येक सणावाराला, शुभकार्याला ही काळ्या वाटाण्याची उसळ हमखास बनवली जाते. बरं हे सगळं जेवण ऑर्डरचं आहे, म्हणजे माझ्या आईने जेवणाची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे.’
‘ही तिची चौथी-पाचवी ऑर्डर आहे. मोदकांपासून सुरुवात झाली मग पुरणपोळ्या, फिश, व्हेज बिर्याणी आणि आज काळ्या वाटण्याची उसळ आणि आंबोळ्या… आता मी घरी असल्यामुळे आईला मदत करू शकतेय.’
खरंतर आमचं खूप वर्षांपासूनचं स्वप्न आहे, आम्हाला एखादं क्लाउड किचन किंवा रेस्टॉरंट सुरू करायचं. बघु ते कधी सुरू होतंय. आईला या नवीन प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया! गणपती बाप्पा मोरया! होईलचं लवकर सगळं सुरू, असेही ती म्हणाली.
दरम्यान, रुपालीने आईच्या नवीन व्यवसायाबाबत माहिती दिल्यीनंतर आता चाहत्यांकडूनही त्यांना नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.